नवी मुंबई : करोनाचा बनावट नकारात्मक अहवाल देणाऱ्या तीन जणांना गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. आरोपी हे नामांकित प्रयोगशाळेत बनावट अहवाल तयार करीत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी रबाळे एमआयडीसी भागातही अशाच प्रकारची टोळी जेरबंद केली होती.

साजिद दाऊद उपाध्ये, अनिकेत दुधावडे आणि राहुल पांडे अशी अटक आरोपींची नावे आहेत.  गेल्या महिन्यात रबाळे एमआयडीसीतील प्रवीण इंडस्ट्रीज या कंपनीत काम करणाऱ्या १३३ कामगारांची करोना चाचणी करण्यात आली मात्र या सर्वच १३३ कामगारांचे अहवाल नकारात्मक बनविण्यात आले होते. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी तपास करून मिडटाऊन डायग्नोस्टिक प्रयोगशाळेचे मालक देविदास घुले व त्यांचे सहकारी परफेक्ट प्रयोगशाळेचे मालक महमद वासिम असलंम शेख यांना अटक केली होती.

या घटनेला एक महिनाही उलटला नाही तोच अशाच प्रकारे काम करणाऱ्या दुसऱ्या एका टोळीबाबत गुन्हे विभागाला माहिती मिळाली होती. खारघर सेक्टर ३५ येथील मंजिरी पॅराडाइज येथे एक व्यक्ती चाचणी न करता २ हजार ५०० रुपयांत करोना नकारात्मक असल्याचा अहवाल देत होती. या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक एन.बी.कोल्हटकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश तांबे, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सनी पवार, हवालदार नितीन जगताप, विष्णू पवार, मेघनाथ पाटील यांनी सापळा लावत साजिद दाऊद उपाध्ये याला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर त्याचे साथीदार अनिकेत दुधावडे याला घाटकोपर आणि राहुल पांडे याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे अटक करण्यात आली आहे.  घरपोच वस्तू सेवा देणारे तसेच एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना करोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे अशा बनावट अहवालांची मागणी होत आहे. याचा गैरफायदा घेत असे अहवाल देणाऱ्या टोळय़ा सक्रिय झाल्या आहेत. याच प्रमाणे रेमडेसिविरचा काळा बाजार करणाऱ्या टोळय़ाही कार्यरत आहेत. त्यांच्यावर गुन्हे अन्वेषण विभाग लक्ष ठेवून असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त बी.जी.शेखर पाटील यांनी सांगितले.