वाशी पालिका करोना रुग्णालयासह पाच केंद्रात नवीन प्रवेश नाही; चारच ठिकाणी उपचार केंद्रीत

नवी मुंबई : नवीन रुग्णांत झालेली घट तसेच उपचाराधीन रुग्णसंख्याही घटल्याचे दिलासादायक चित्र नवी मुंबईत आहे. त्यामुळे करोनाबाधितांमुळे भरलेल्या खाटा आता रिकाम्या होत आहेत.  शहरातील तीन करोना काळजी केंद्रांत सध्या एकही बाधित नसल्याने ती तात्पुरती बंद करण्यात आली असून पाच केंद्रात तात्पुरता प्रवेश बंद केला आहे.

शहरात करोनाबाधितांची संख्या ४३,६०० पेक्षा जास्त झाली आहे, तर ८७८ जणांचा मृत्यू झाला आहे. सात महिन्यांपासून सुरू असलेला करोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत आहे. महिनाभरात नव्या करोना रुग्णांबरोबरच उपचाराधीन रुग्णांची संख्याही घटली आहे. प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये महिनाभरात ११४७ रुग्ण कमी झाले आहेत. २ हजार ४८ रुग्ण हे उपचार घेत आहेत.

करोना नियंत्रणासाठी नवी मुंबईत विविध उपनगरात करोना काळजी केंद्रे निर्माण केली आहेत. पालिकेच्या समाजमंदिरामध्ये प्राधान्याने ही केंद्रे आहेत. वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्राबरोबरच निर्यात भवन तसेच राधास्वामी सत्संग भवन अशा विविध ठिकाणीही मोठय़ा स्वरूपात ही काळजी केंद्रे उभारली आहेत. पंधरा दिवसांपूर्वी  सर्व काळजी केंद्रात बाधितांची संख्या जास्त होती. मात्र आता करोनाबाधितांत दिवसेंदिवस घट  होत असल्याने पालिका प्रशासन ती तात्पुरती बंद करीत आहे.

वाशी सेक्टर १४, वारकरी भवन बेलापूर तसेच इंडिया बुल्स येथे एकही करोनाबाधित नाही. इंडिया बुल्स येथील प्रवेश अगोदरच बंद करण्यात आला आहे. आता या दोन केंद्रांतही एकही रुग्ण नसल्याने ते तात्पुरते बंद करण्यात आले आहे. इतर पाच करोना काळजी केंद्रांत नवीन प्रवेश बंद केला असून उपचार घेत असलेला शेवटचा रुग्ण घरी सोडल्यानंतर तीही तात्पुरती बंद करण्यात येणार आहेत. आता चार प्रमुख काळजी केंद्रांवरच उपचार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात सिडको प्रदर्शनी केंद्र, राधास्वामी सत्संग भवन, निर्यात भवन व डॉ.डी.वाय पाटील रुग्णालयाचा समावश आहे.

पालिका प्रशासनाने इतर ठिकाणची आरोग्यव्यवस्था तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पालिकेच्या वाशी रुग्णालयातील नवीन प्रवेशही बंद केला आहे. त्यामुळे नवीन दाखल रुग्ण ही डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात हलविण्यास प्रधान्य दिले जात आहे. त्यामुळे महिनाभरात फक्त या एकमेव रुग्णालयातील करोनाबाधितांची संख्या ही २०० वरून २८० वर गेली आहे.

उपचाराधीन रुग्ण स्थिती

रुग्णालय नाव                  २६ सप्टेंबर     २६ ऑक्टोबर

वाशी रुग्णालय                     १४४               ७०

सिडको प्रदर्शनी                    ५४१                ४२६

एमजीएम सानपाडा               ५०                 ११

निर्यात भवन                         १५०               ८८

राधास्वामी सत्संग                १६०                १४९

इंडिया बुल्स                             ०                   ०

कोपरखैरणे समाजमंदिर          ४८                 ०

आगरी कोळी भवन                ५०                   ५०

ऐरोली समाजमंदिर                 ५०                 १०

नेरुळ समाजमंदिर                  ४७                १७

वारकरी भवन, बेलापूर            ०                   ०

ईटीसी केंद्र                            ५९                 १०

लेवा पाटीदार समाज :           ०                   २८

डी वाय पाटील रुग्णालय :   २००                 २८०

पालिकेची मुख्य करोना आरोग्यसेवा येथे मिळणार

* सिडको प्रदर्शनी केंद्र, राधास्वामी सत्संग भवन, निर्यात भवन, डॉ.डी.वाय. पाटील रुग्णालय शून्य रुग्ण असलेली केंद्रे

* वाशी सेक्टर १४ समाजमंदिर, वारकरी भवन बेलापूर, कोपरखैरणे समाजमंदिर, इंडिया बुल्सही केंद्रे होणार टप्प्याटप्प्याने तात्पुरती बंद..

* आगरी कोळी भवन, ईटीसी केंद्र, नेरुळ समाजमंदिर, लेवा पाटीदार हॉल

नवी मुंबई शहरातील करोनाची स्थिती अत्यंत दिलासादायक आहे, परंतु म्हणून पालिका प्रशासन व नागरिकांनीही बिनधास्त राहणे योग्य नाही. अमेरिकेत तिसरी, तर इटली, फ्रान्समध्ये दुसरी लाट आली आहे. त्यामुळे शहरात उपचाराधीन रुग्ण कमी झाल्याने काही केंद्रे तात्पुरती बंद केली असली तरी नागरिकांनी नियमांचे पालन करून पालिकेला सहकार्य करावे.

-अभिजित बांगर,आयुक्त नवी मुंबई महापालिका