वाशीतील तीन माजी नगरसेवक शिवसेनेत जाण्याच्या तयारीत

नवी मुंबई : एक वर्षांपूर्वी गणेश नाईक यांच्याबरोबर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ५२ नगरसेवकांपैकी नऊ नगरसेवकांनी नाईकांना सोडचिठ्ठी दिली असून एकाच घरातील आणखी तीन माजी नगरसेवक या आठवडय़ात शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा वाशी ग्रामीण भागासह शहरी भागावर वरचष्मा आहे. ते गेली अनेक दिवस भाजपपासून लांब राहात असून शिवसेना किंवा अपक्ष असे दोन पर्याय त्यांनी ठेवले आहेत. तसेच घणसोली गावातील एकाच घरातील दोन नगरसेवक शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये येण्याच्या तयारीत आहेत.

नवी मुंबई पालिकेत निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. गेल्या वर्षी याच महिन्यात सुरू झालेली निवडणूक लगबग करोना साथ रोगामुळे थांबली होती. करोनाकाळात अनेक निवडणुका पार पडल्याने पालिका निवडणूकही पुढील महिन्यात होण्याची शक्यता असून सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने शिवसेना व राष्ट्रवादीकडे भाजपच्या नगरसेवकांचा कल वाढला असून नवी मुंबईत तुर्भे, दिघा, वाशी आणि सीबीडी येथील काही माजी नगरसेवकांनी शिवसेना व राष्ट्रवादीला पसंती दिली आहे. हे धक्कातंत्र यापुढेही सुरू राहणार असून नाईक यांच्याबरोबर काँग्रेस सोडून भाजपत दाखल झालेले वाशी सानपाडा भागातील एकाच घरातील तीन नगरसेवकही शिवसेना अथवा अपक्ष असा पर्याय शोधत आहेत. शिवसेनेच्या नेत्यांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून स्वबळावर निवडून येण्याची ताकद असलेले हे तीन नगरसेवक अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत देखील आहेत. त्यासाठी गेले

अनेक दिवस आपल्या सामाजिक संस्थेच्या नावावर सामाजिक कार्य घेऊन सर्वच राजकीय पक्षापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे. अपक्ष निवडून आल्यास भाजप व शिवसेना हे दोन्ही पर्याय शिल्लक राहणार असून तडजोड करण्याची ताकद वाढणार आहे.

मावळत्या सभागृहात शिवसेनेचे ३८ नगरसेवक होते. त्यात आता राष्ट्रवादी भाजपच्या ९ नगरसेवकांची भर पडली असल्याने माजी नगरसेवकांची संख्या ४७ झाली आहे. हे सर्व माजी नगरसेवक पुन्हा निवडून येतील अशी खात्री पक्षाला आहे. या ४७ नगरसेवकांतील घणसोली गाव व शहरी भागातील दोन नगरसेवक भाजपच्या गोटात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप समतोल साधण्याचा प्रयत्न करणार असून नाराज माजी नगरसेवकांना आपल्या गोटात घेण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत.

भाजपने देश व राज्य पातळीवरील नेते या निवडणुकीत उतरविण्याचे ठरविले आहे. मुंबई पालिका निवडणुकीच्या रचनेत दूर ठेवलेल्या आमदार आशीष शेलार यांना या निवडणुकीचे प्रभारी नेमण्यात आले असून नाईक यांना दुखवण्यात येऊ नये यासाठी त्यांना प्रमुख पद देण्यात आले आहे.

कोळी महासंघाचे अध्यक्ष व विधान परिषद आमदार रमेश पाटील यांनाही नवी मुंबईत लक्ष घालण्यास पक्षाने सांगितले असून नाईक व पाटील या दोन दादांच्या अलीकडे एकत्रित बैठका होऊ लागलेल्या आहेत. आगरी समाजाच्या बरोबरीने नवी मुंबईत कोळी समाज असून पाटील त्यांचे राज्यव्यापी नेतृत्व करीत असून त्यांचा या समाजात चांगला प्रभाव आहे.