पालिका प्रशासनाची तिसऱ्या लाटेसाठी तयारी; नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन

नवी मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेत आलेला अनुभव पाहता महापालिका प्रशासन वेळीच दक्ष झाले असून तिसऱ्या लाटेत  मुलांना करोना संसर्गाचा धोका  पाहता आतापासूनच नियोजन केले आहे. यासाठी बेलापूर येथे लहान मुलांसाठी विशेष काळजी केंद्राची तयारी प्रशासनाने ठेवली आहे.

करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पालकांत चिंता आहे. मात्र १ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांना करोनाचा संसर्ग झाला तरी त्यांच्यामध्ये धोका अत्यल्प राहणार असल्याचे मत बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केले आहेत. तरीही दक्षता म्हणून पालकांनी मुलांची काळजी घेत त्यांच्यात काही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष न करता दक्ष राहण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

पहिल्या लाटेत शहरात दैनंदिन करोना रुग्णांची सर्वोच्च संख्या ही ४७७ इतकी मर्यादित राहिली होती. त्यामुळे पालिका प्रशासनाने या वेळी तयार केलेली आरोग्य व्यवस्था पुढेही संकट कायम राहिले तरी अपुरी पडणार नाही असा अंदाज बांधला होता. मात्र दुसऱ्या लाटेत करोना संसर्ग शहरात मोठय़ा प्रमाणात पसरत जात झपाटय़ाने रुग्णवाढ झाली. या काळातील सर्वोच्च रुग्णसंख्या ही १४४१ पर्यंत गेली. त्यामुळे सर्वच आरोग्य व्यवस्था कमी पडली. खाटा, प्राणवायू, जीवरक्षक प्रणाली व आरोग्य मनुष्यबळ तोकडे पडले. त्यानंतर राज्य सरकारने लागू केलेल्या कडक संचारबंदीनंतर ही परिस्थिती कमी होत गेल्याने मोठे संकट सध्या तरी दूर झाले आहे. मात्र आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असून त्यात लहान मुलांना अधिक धोका संभवत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने मागील अनुभव पाहता वेळ आल्यानंतर नियोजन करण्यापेक्षा आतापासूनच नियोजन हाती घेतले आहे. मुलांमध्ये करोनाचा संसर्ग वाढणार असला तरी गंभीरतेचे स्वरूप खूपच कमी असेल अशी शक्यता बालरोगतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे पालकांनी घाबरून न जाता मुलांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. धोका नसला तरी तयारी म्हणून प्रशासनाने त्यांच्यावरील उपचारांसाठी पुरेशा संख्येने प्राणवायू, अतिदक्षता व जीवरक्षक प्रणाली असलेल्या खाटा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला केल्या आहेत.

शहराची तरंगती लोकसंख्या १५ लाख असून त्यात ३५ टक्के ही मुलांची संख्या असणार आहे. १ ते १७ वयोगटातील अंदाजे पाच लाखांच्या वर मुलांची संख्या असणार आहे. त्यासाठी वैद्यकीय मनुष्यबळापैकी काही जणांना बालकांशी संबंधित विभागामध्ये तसेच अतिदक्षता विभागामध्ये काम करण्याविषयीचे विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. लहान मुलांच्या विभागामध्ये मुलाचे आई किंवा वडील ‘केअर टेकर’ म्हणून थांबणे आवश्यक ठरते. याचा विचारही सुविधा निर्माण करताना व्हाव्यात आशा सूचना करण्यात आल्या असल्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केल्या आहेत. मार्गदर्शक नियमावलीही करण्यात येणार आहे. लहान मुलांसाठी ३०० खाटांची उपचारासाठी तयारी केली आहे.

मुलांनाही मास्कची सवय लावा

लहान मुलांमध्ये प्रादुर्भावाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी ते प्रमाण अल्प असेल असे तज्ज्ञांचे मत आहे. पालिका कोणतीही जोखीम पत्करणार नसून मुलांसाठी स्वतंत्र ३०० खाटांची व्यवस्था बेलापूर विभागात करण्याची तयारी सुरू केली आहे. पालकांप्रमाणेच मुलांमध्येही मास्क वापरण्याचे संस्कार जपण्याची खबरदारी सर्व पालकांनी घ्यावी, असे आवाहन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव होईल अशी शक्यता खूपच कमी असून पालकांनी अजिबात घाबरून जाऊ  नये. प्रादुर्भाव मुलांमध्ये झाला तरी गंभीरतेची टक्केवारी अल्प राहण्याची शक्यता आहे. मात्र पालकांनी मुलांमध्ये आढळून येणाऱ्या कोणत्याच लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. तात्काळ तपासणी व तात्काळ उपचार घेतल्याने आजार लवकर बरा होतो.

– डॉ. उपेंद्र किंजवडेकर, बालरोगतज्ज्ञ व टास्क फोर्स सदस्य बालरोगतज्ज्ञांचे पथक

तिसऱ्या लाटेत आरोग्य सुविधा अपुरी पडू नये म्हणून पनवेल पालिकेने तयारी सुरू केली आहे. लहान मुलांमध्ये धोका लक्षात घेत खाटांच्या नियोजनाबरोबर बालरोगतज्ज्ञांचे पथक तयार ठेवण्यात येणार आहे.   वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी प्राथमिक चर्चा करण्यात आली .