नवी मुंबई काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षांकडून तीन जागांची मागणी

राज्याच्या सत्तेत झालेली महाविकास आघाडी (मविआ) नवी मुंबई पालिका निवडणुकीतही  करण्याचा निर्णयाबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त केली जात आहे. ‘मविआ’चा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक यांनी स्वत:साठी तीन प्रभागांची मागणी केल्याने ‘मविआ’धुसफूस वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मात्र त्याचवेळी कौशिक यांनी अशा प्रकारची कोणतीही मागणी आपण केली नसल्याचे सांगितले.  दरम्यान, शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आयाराम-गयारामांना उमेदवारी दिल्यास बंडखोरीचा इशारा दिला आहे.

नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या घोषणेकडे साऱ्याच पक्षांचे लक्ष लागलेले आहे. होळीनंतर पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेली २५ वर्षे पालिकेत असलेली नाईक यांची एकहाती सत्ता उलथवून टाकण्यासाठी ‘मविआ’चे राज्य पातळीवरचे नेते मैदानात उतरले आहेत. राज्यात ‘मविआ’चा प्रयोग यशस्वी होताना दिसत असल्याने पालिकेसाठी नवी मुंबईत हा पहिला प्रयोग केला जाणार आहे. त्यासाठी तीन महिने आधीच ‘मविआ’ची घोषणा करण्यात आली आहे. सर्वसाधारपणे प्रभाग वाटपाचे सूत्र  ठरविण्यात आले आहे. यात शिवसेनेला १११ पैकी ७१ प्रभाग, राष्ट्रवादीला २३; तर काँग्रेसच्या वाटय़ाला १७ प्रभाग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात विद्यमान नगरसेवक आहेत, त्यांचे प्रभाग न बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस वा राष्ट्रवादीच्या वाटय़ाचे प्रभाग कमी होण्याची अधिक शक्यता आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय हा होळीनंतर घेतला जाणार आहे. तिन्ही पक्षांची आघाडी करण्यावर एकमत झाले आहे. राज्य सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या काँग्रेसने नवी मुंबईत पडेल ते पदरात घेण्याची भूमिका घेतली आहे. आघाडी धर्म पाळण्याचा आदेश पक्षश्रेष्ठींनी दिला असल्याने चार पावले मागे जाण्याची तयारी या पक्षाने ठेवली आहे. पक्षाचे येथील अध्यक्ष अनिल कौशिक यांनी स्वत:सह त्यांची पत्नी, मुलासाठी तीन प्रभागांची मागणी ‘मविआ’कडे केली आहे. त्यामुळे ‘मविआ’तील प्रमुख नेत्यांसमोरचा पेच वाढला आहे.

‘आयाराम-गयारामांना थारा नको’

काँग्रेस अध्यक्षाच्या या मागणी बरोबर शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळी पक्षात आलेल्या आयाराम-गयारामांना उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी मोहिम सुरू केली आहे. अशा प्रकारे सत्तेची फळे चाखण्यासाठी पक्षात नवीन आलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्यास बंडखोरी करण्याची इशारा वाशी आणि कोपरखैरणेतील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

नवी मुंबई पालिका निवडणुकीत ‘मविआ’ होणारच आहे. तसा पक्षश्रेष्ठींचा आदेश आहे. काँग्रेस यासाठी चार पावले मागे येण्यास तयार आहे. त्यामुळे एकाच घरात तीन उमेदवारी मागण्याचा प्रश्नच येत नाही. माझी पत्नी पालिका निवडणूक लढविणार नाही. माझ्या उच्च शिक्षित मुलाला संधी द्यावी, अशी माझी मागणी आहे.

-अनिल कौशिक, नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष