शासनाने भूमिहीन व अल्पभूधारकांच्या पाल्यांसाठी ९ वी ते १२ वी या वर्गासाठी दरमहा शंभर रुपये शिष्यवृत्ती जाहीर केली असून आम आदमी विमा योजना अंतर्गत याची अंमलबजावणी या योजनेचा फायदा घेत के. सी. शर्मा याने एलआयसी एजंट असल्याचे सांगत रायगड जिल्ह्य़ातील हजारो विद्यार्थ्यांकडून प्रत्येक दोनशे रूपये घेत फसवणूक केली आहे. यामध्ये उरणमधील दहा शाळांतील एकूण ३ हजार १५७ विद्यार्थ्यांचाही समावेश असून ६ लाख ३१ हजार ४०० रुपयांची फसवणूक झाली. या संदर्भात उरण तहसील कार्यालयाने पोलीस ठाण्यात एजंट विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शासनाने जाहीर केलेल्या आम आदमी विमा योजने नुसार एलआयसीचा एजंट असल्याचे सांगून शर्मा याने रायगड जिल्हयातील विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.या प्रकरणी अनेक शाळांनी विविध तालुक्यात एजंट विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. यामध्ये उरण तालुक्यातील शाळांची माहिती घेऊन उरणच्या संजय गांधी योजनेच्या नायब तहसीलदार दीपाली पुरारकर यांनी सोमवारी उरण पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २०० रुपये रोख घेण्यात आलेले आहेत. तसेच पालकांच्या सह्य़ा व त्यांच्या बँक बुकाच्या झेरॉक्सही घेण्यात आल्या आहेत. यात रामचंद्र म्हात्रे विद्यालय-आवरे ५६५ विद्यार्थ्यांचे १ लाख १३ रुपये, पांडुरंग चांगू पाटील विद्यालय चाणजे-२५ विद्यार्थी ५ हजार रुपये,प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी मोठी जुई १४९ विद्यार्थ्यांचे २९ हजार ८०० रुपये, स्वातंत्र्य वीर सावरकर विद्यालय नवीन शेवे-२८१ विद्यार्थी ५६ हजार २०० रुपये, द्रोणागिरी हायस्कूल करंजा २२९ विद्यार्थी ४५ हजार ८००, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन-५०७ विद्यार्थी १ लाख १४०० रुपये, तु. ह. वाजेकर, विद्यालय फुंडे-३७६ विद्यार्थी ७५ हजार,जेएनपीटी मराठी माध्यम-३६२ ७२ हजार ४०० रुपये, जेएनपीटी इंग्रजी माध्यम २६०- यांचे ५२ हजार रूपये तर सेंट मेरिज स्कुल,उरण ४०३ विद्यार्थ्यांचे ८० हजार ६०० रुपये असे एकूण ६ लाख ३१ हजार ४०० रुपये रोखीने जमा करून एजंट फरारी झाला आहे. उरण तालुक्यातील शाळांची,विद्यार्थ्यांची तसेच शासनाचीही फसवणूक केल्याने ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.