उरण-जेएनपीटी बंदराला जोडणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब व राज्य महामार्ग क्रमांक ५४ असे दोन मार्ग असून या मार्गाच्या रुंदीकरणानंतर राज्य महामार्गावर दास्तान(जासई) येथे तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ बवर चिर्ले आणि करंजाडे असे तीन टोलनाके बसविण्यात आलेले होते. या दोन्ही रस्त्यांचे मुंबई जेएनपीटी पोर्ट रोड कंपनीचे सहा व आठ पदरी रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी तीनही टोलनाके १ मे २०१६ पासून बंद करण्याची सूचना भारतीय राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी टोल चालविणाऱ्या दोन कंपन्यांना दिली आहे.
जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑगस्ट २०१४ मध्येच करण्यात आलेले होते.तर यासाठी भारतीय राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने निविदा जाहीर केल्या आहेत. यामध्ये २०१८ पर्यंत या दोन्ही रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची मुदत आहे.त्यामुळे रस्ता रुंदीकरणाच्या कामाला युद्ध पातळीवर सुरुवात करण्यात येणार असल्याने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या दिल्ली येथील बैठकीत या मार्गावरील दास्तान,चिर्ले तसेच करंजाडे या तीनही ठिकाणचे टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.तशी सात दिवसांची नोटीस पनवेलच्या भारतीय राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाचे प्रकल्पाधिकारी प्रशांत फेगडे यांनी ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट व एमईपी या दोन्ही टोल वसुली करणाऱ्या कंपन्यांना दिली आहे. यापूर्वी या दोन्ही मार्गावरील उरण-पनवेल व नवी मुंबईतील स्थानिक वाहन मालकांच्या वाहनांना मुंबई जेएनपीटी रस्ता कंपनीने टोलमधून सूट दिलेली होती.त्यामुळे उरणमध्ये ये जा करण्यासाठी स्थानिकांना टोल माफी करण्यात आलेली होती. या संदर्भात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी जेएनपीटी परिसरातील टोलनाके कायमस्वरूपी बंद करण्याचे संकेत दिलेले होते.त्यासाठी बंदरातील मालाची ने आण करणारी वाहने रस्त्यावर न राहता थेट बंदरात जाऊन बंदराच्या कामाकाजाला वेग येणार असल्याने रस्त्यांचे रुंदीकरण झाल्यानंतर टोल राहतील का असा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे असलेले टोल नाके बंद केल्याने टोल नाक्यांवर काम करणाऱ्या कामगारांना मात्र आपल्या रोजगाराला मुकावे लागणार आहे.