फलटणच्या शेतकऱ्यांकडून मागणी; सौरऊर्जेचीही निर्मिती

सीमा भोईर, पनवेल</strong>

पनवेल शहरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर नावडे येथील प्रकल्पात प्रक्रिया करून दररोज तीन टन सेंद्रिय खतनिर्मिती होत आहे. याला शेतकऱ्यांकडून चांगली मागणी असून या खतावर सातारा जिल्ह्य़ातील फलटण तालुक्यातील शेती बहरत आहे.

शेतीसाठी रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मोठे दुष्परिणाम समोर येत आहेत. शेतीचे आरोग्यच धोक्यात येत आहे. त्यामुळे आता सेंद्रिय उत्पादनाला मागणी वाढत आहे. याच विचार करून पनवेल महापालिका शहरात निर्माण होणाऱ्या पाच टन ओल्या कचऱ्यावर नावडे येथील प्रकल्पात प्रक्रिया करून खतनिर्मिती केली जात आहे. ‘पीएसएल वेस्ट मॅनेजमेंट’ या संस्थेमार्फत या प्रकल्पातून दररोज तीन टन सेंद्रिय खताची निर्मिती होत आहे. शहरातील उपाहारगृह व्यावसायिकांशी संस्थेने करार केला असून ओला कचरा पाच वाहनांनी उचलून तो नावडे येथील प्रक्रिया केंद्रांवर वर्गीकरण करून त्याची मळी तयार केली जाते. शेण आणि मळी टाकून दर्जेदार सेंद्रिय खत निर्माण होत आहे. नगरसेवक अरविंद म्हात्रे यांच्या संकल्पनेतून ही योजना साकारली आहे.

फलटण तालुक्यातील विडणी, तरडगाव, आसू, राजाळे, पवारवाडी, साखरवाडी, निंभोरे, सालपे, सांगवी, भीमनगर, बरड, गोखळी, फरांदवाडी, मिरगाव, वाठार निंबाळकर, तरडफ, ढवळ, वाखरी, हिंगणगाव, सासवड, कापशी, सोनगाव, दालवडी, उपळवे या गावांतील शेतकरी हे सेंद्रिय खत घेत असून शेतीसाठी फायदा होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

शेतीच्या तापमान नियमनासाठी उपयोग

सेंद्रिय खतांमुळे मातीवर गारवा निर्माण होत असून तापमान वाढत नाही. ते खत माती घट्ट धरून ठेवते. उष्ण तापमानात जमिनीत गारवा व कमी तापमानात जमीन उष्ण ठेवणे सेंद्रिय खतामुळे शक्य होते. यामुळे जिवाणूंची वाढ होते. त्यात रोग निर्माण करणारे जिवाणूही असतात. अशा वेळी ‘ट्रायकोडरमा’ नावाचे जिवाणू जमिनीत सोडल्यास रोग निर्माण करणाऱ्या जिवाणूंचा नाश होतो. असे असंख्य फायदे असल्याने आम्ही हे खत घेऊन जातो, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

पाच वॉॅट वीजनिर्मिती

सौरऊर्जेवर हा प्रकल्प सुरू असून तेथेच सौरऊर्जा निर्माण केली जात आहे. या प्रकल्पावर ३३० वॉटचे २५ सौर पॅनल बसविले असून त्यातून पाच वॅट वीजनिर्मिती होत आहे.

पनवेल पालिका क्षेत्रातील ओल्या कचऱ्यावर नावडे येथील प्रकल्पात प्रक्रिया करून सेंद्रिय खतनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे महिन्याला दोन मेट्रिक टनापर्यंत कचऱ्याची विल्हेवाट शक्य होऊन यासाठी पालिकेचे ८ ते ९ लाख रुपयांची बचत होत आहे.

-दौलत शिंदे, आरोग्य निरीक्षक, पनवेल पालिका

साताऱ्यातील शेतकरी वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये शेतमाल घेऊन येतात. रासायनिक खतांचे दुष्परिणाम सर्वश्रुत असल्याने हे शेतकरी येथील सेंद्रिय खत घेतात. फक्त वाहतुकीचाच खर्च द्यावा लागत असल्याने त्यांना ते परवडत आहे.

-पोपट लोखंडे, पीएसएल वेस्ट मॅनेजमेंट, संचालक