मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील नेरुळ उरण मार्गावरील बामणडोंगरी रेल्वेस्थानकात तिकीट तपासनीस म्हणून कार्यरत असलेल्या सुपर्णा खरोटे हिला तिकीट दाखवण्यास सांगितले म्हणून प्रवाशाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. तिने या विरोधात पनवेल रेल्वे पोलिसात तक्रार दाखल केली असून ती एनआरआयम् पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे. उलवे येथे राहण्यास असलेल्या व बामणडोंगरी येथे कनिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत असलेल्या तिकीट तपासणीस महिलेने २८ सप्टेंबरला बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या फलाटावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीस तिकीट दाखवण्यास सांगीतले.

मात्र, त्याने थातुरमातुर कारणे देत उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, महिला तिकीट तापणीसाने त्यास कारवाई संदर्भात सांगितल्यावर त्याने तिला मारहाण केली. अचानक घडलेल्या प्रसंगाने तिकीट तपासणीसही घाबरली. त्या इसमाने या महिला कर्मचाऱ्यास रेल्वेखाली ढकलण्याचा प्रयत्न केला. तिनेही त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र तो निसटल्याचे तिकीट तपासणीस महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.