दुप्पट भाव : ४० ते ४५ रुपये किलो

कमी उत्पादनामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने गेला महिनाभर चढे असलेले टोमॅटोचे भाव घाऊक बाजारात उतरले आहेत. मात्र किरकोळीत ग्राहकांची लूट सुरूच आहे. घाऊकमध्ये २५ रुपयांवरून १६ ते १८ रुपयांपर्यंत आले असून किरकोळीत टोमॅटो ४० ते ४५ रुपयांनी विकला जात आहे.

वाशीतील एपीएमसी बाजारात थंडीने टोमॅटोच्या उत्पादनात घट झाल्याने भाववाढ झाली होती. आता जादा आवक सुरू असून ९ रुपयांनी भाव उतरले आहेत.

घाऊक आणि किरकोळ बाजारात आवक घटल्याने एक जानेवारीपासून टोमॅटोची भाववाढ झाली होती. १५ दिवस बंगळूरूमधून होणारी आवक पूर्णपणे बंद होती तर राज्यातून होणारी आवकही घटली होती. त्यामुळे घाऊक बाजारात टोमॅटो २५ रुपयांपर्यंत गेला होता. तर किरकोळीत ४० ते ४५ रुपयांपर्यंत विकला जात होता.

आता बाजारात बंगळुरूमधून दररोज २ गाडय़ा तर राज्यातून २५ ते ३० गाडय़ा दाखल होत आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात प्रतिकिलो २५ रुपयांवर असलेले टोमॅटोचे भाव कमी होऊन १६ ते १८ रुपयांवर आले आहेत. मात्र किरकोळ बाजारात ग्राहकांची लूट सुरूच आहे.

वाटाण्याची आवक वाढली

एपीएमसी बाजारात या हंगामात हिरवे वाटण्याची जादा आवक होत असते. मध्य प्रदेश येथून वाटाणा दाखल होत असून बाजाराभव देखील ४ ते ५ रुपयांनी भाव उतरले आहेत. सध्या बाजारात ४० गाडय़ा दाखल होत असून घाऊकमध्ये प्रतिकिलो २० ते २२ रुपयांवर असलेला वाटाणा आता १४ ते १६ रुपयांवर तर किरकोळमध्ये ३० रुपयांवर विक्री होत आहे.

१५ दिवसांच्या कालावधीत टोमॅटोची आवक घटली होती, परंतु आता परराज्यातून तसेच राज्यातून होणारी आवक वाढत आहे. त्यामुळे घाऊकमध्ये बाजारभाव उतरले आहेत.

-कैलास तांजणे, अध्यक्ष, घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ.