अतिवृष्टीमुळे भाज्यांची आवक घटल्याने दरवाढ

नवी मुंबई : मुंबईला भाजीपुरवठा करणाऱ्या पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात संततधार पावसाने नवी मुंबईतील घाऊक बाजारात होणारी दैनंदिन आवक घटली असून भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. भाज्यांचे दर घाऊक बाजारात तीस रुपयांपेक्षा जास्त असल्याने किरकोळ बाजारात या भाज्या साठ ते सत्तर रुपये किलोने विकल्या जात आहेत. टोमॅटो तीस रुपये किलो आहे तर वाटाण्याने शंभरी गाठली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी काळात अत्यावश्यक सेवा म्हणून नवी मुंबईतील पाचही घाऊक बाजारपेठा कमी अधिक प्रमाणात सुरू होत्या. प्रतिबंधात्मक उपाय करून घाऊक बाजार आता सर्वासाठी खुला झाला असून करोनाच्या भीतीमुळे आजही घाऊक बाजारात येणाऱ्या भाज्यांची आवक घटलेली आहे. त्यामुळे अगोदर असलेली दरवाढ गेली तीन-चार दिवस पडत असलेल्या पावसाने अधिक झाली आहे. सोमवारी घाऊक बाजारात ४२३ ट्रक टेम्पो भरून भाजी आल्याची नोंद आहे. तेवढीच भाजी मुबंईत गेली आहे. मात्र करोना आणि अतिवृष्टीमुळे घाऊक बाजारातच भाज्या तीस ते चाळीस टक्क्यांनी महाग झालेल्या आहेत. सर्वसाधारणपणे सप्टेंबरमध्ये भाज्यांची आवक वाढून दर कमी होत असल्याचा अनुभव आहे. मात्र आज घाऊक बाजारात भेंडी ४० रु., दुधी ४० रु., चवळी ३५ रु., ढेमसे ४५ रु., फरसबी ४३ रु., गाजर ३५ रु., गवार ५५ रु., घेवडा ३३ रु., ढोबळी मिरची ३८ रु., टोमॅटो ३० रु. आणि वाटाणा थेट १०० रुपये किलोने विकला गेला आहे.

दोन आठवडे दरवाढ

प्लॉवर आणि कोबी या सर्वसाधारण भाज्याही वीस रुपये किलोने बाजारात उपलब्ध आहेत. घाऊक बाजारात विकल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये वीस ते तीस टक्के  वाहतूक व इतर खर्च मिळवून ही भाजी किरकोळ बाजारात चढय़ा दराने विकली जात आहे. ही दरवाढ आणखी दोन आठवडे राहण्याची शक्यता असून पाऊस कमी झाल्यानंतर ही दरवाढ आटोक्यात येण्याची शक्यता आहे.