दहीहंडी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, नियमात अडकून न राहता वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न

यावर्षी थरांवरील र्निबधाला पर्याय म्हणून उरणमधील दोन पथकांनी पाच थर लावीत फिरत्या मनोऱ्याचा खेळ सादर केला. राघोबा देव पथक कोटनाका व मी केगांवकर गोविंदा पथकाने हा खेळ सादर केला. हा खेळ पाहण्यासाठी उरणमधील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

अनेक ठिकाणी न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवीत गोविंदांनी दहीहंडी साजरी केली. मात्र उरण तालुक्यातील गोविंदा पथकांनी न्यायालयाच्या नियमांचे पालन करीत आपल्या सरावाचा उपयोग केला. यावेळी उरण नगरपालिकेच्या वतीने आयोजित दहीहंडीच्या वेळी राघोबा देव गोविंदा पथक व मी केगांवकर पथकाने पाच थर लावून पहिल्या थरापासून ते पाचव्या थरापर्यंत रचलेल्या मनोऱ्याला फिरवत एक वेगळा थरार सादर केला. या नव्या प्रकाराला उरणमधील गोविंदा पाहणाऱ्यांनीही दाद दिली.

संगीताच्या तालावर केलेल्या या फिरत्या मनोऱ्यांमुळे या दोन्ही पथकांचे आयोजकांनीही अभिनंदन केले. न्यायालयाच्या निर्णयानंतर सराव कायम ठेवत या प्रकारचा सराव केल्याची माहीती या गोविंदा पथकांच्या आयोजकांनी दिली. अशा प्रकारच्या वेगळ्या सादरीकरणामुळे नियमात अडकून न राहता उत्साहात वेगळेपण आणता येते हे उरणच्या या गोविंदा पथकांनी दाखवून दिले.