९८ कोटींच्या निधीची घोषणा; सुसज्ज जेट्टी, अत्याधुनिक दुकाने, पर्यटकांसाठी उपाहारगृह उभारणीचे नियोजन

घारापुरी बेटावर वीजपुरवठा सुरू करण्यात यावा, यासाठी एमएमआरडीएकडून २२ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. जागतिक ठेवा असलेल्या या बेटावर जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून वीज पोहोचविली. यापुढेही या बेटावरील पर्यटन व्यवसायात वृद्धी होऊन येथील ग्रामस्थांचा विकास व्हावा, यासाठी पर्यटन विभागाकडून ९८ कोटींचा निधी देणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी केली. घारापुरी येथील वीजपुरवठय़ाचे उद्घाटन निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

समुद्रतळाच्या दीड किलोमीटर खालून केबल टाकून हा वीजपुरवठा करण्याचे महत्त्वाचे काम महावितरण कंपनीकडून करण्यात आले. जेएनपीटीच्या सहकार्याने उरण-पनवेल महामार्गालगत दास्तान येथे ४० कोटी रुपये खर्च करून ‘शिव समर्थ स्मारक’ उभारण्याचीही घोषणा केली. त्याचप्रमाणे घारापुरी येथे वीजपुरवठा सुरू व्हावा यासाठी प्रयत्न करणारे महेश बालदी यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

या लोकार्पण सोहळ्यात आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही आपले विचार मांडले. या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार मनोहर भोईर, आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.

सोयी-सुविधा..

  • बेटावरील स्वच्छता, नागरी सुविधा, पर्यटकांसाठी सुसज्ज जेट्टी, तसेच अत्याधुनिक दुकाने, पर्यटकांसाठी रेस्टॉरंट, रिसॉर्टची व्यवस्था करण्याची योजना पर्यटन विभागाकडून राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
  • संपूर्ण बेटाभोवती एलईडी दिवे लावण्यात येणार असून पर्यटकांसाठी विजेवर चालणारी ट्रेन सुरू करण्याचा विचार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.