सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पर्यटन हा पर्वणीचा शब्द बनला असून ज्याच्या त्याच्या आर्थिक क्षमतेनुसार अनेक जण पर्यटन करू लागले आहेत. नवी मुंबई, रायगडमधील पनवेल आदी ठिकाणचे सर्वसामान्य मध्यवर्गीय आपल्या कुटुंबासह एक दिवसाच्या सहलीसाठीची पिरवाडी बीचला पसंती देत आहेत. त्यामुळे पिरवाडी किनाऱ्यावरील गर्दी वाढू लागली आहे. या ठिकाणी मिळणारे ताजे मासे, घरगुती जेवण तसेच मधुर नारळ पाण्याच्या ओढीने येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मागील अनेक दिवसांपासून वाढ झालेली आहे. दर रविवारी व सुट्टीच्या दिवशी पिरवाडी किनाऱ्यावर मोठय़ा संख्येन पर्यटक येऊ लागले आहेत. याचा फायदा येथील स्थानिक व्यवसायिकांनाही होऊ लागला आहे.
अनेकांना दूरवर जाऊन पर्यटनाचा आनंद लुटणे आर्थिकदृष्टय़ा परवडत नसल्याने जवळच एक-दोन तासात पोहोचता येऊन पर्यटनाचा आनंद लुटता येईल, अशा स्थळांच्या शोधात अनेक जण असतात. उरणला समुद्रकिनारा लाभला असून या किनाऱ्यावर पर्यटकांची संख्या तशी कमीच असते, मात्र मागील काही वर्षांत पर्यटनाची वाढती आवड यामुळे येथील पर्यटकांतही वाढ झालेली आहे.
काही वर्षांपूर्वी एखाददुसरे हॉटेल होते. त्यात वाढ होऊन सध्या उरणच्या किनाऱ्यावर तसेच आजूबाजूलाही खवय्यांसाठी शाकाहारी तसेच मांसाहारी पदार्थ बनविणारी हॉटेल्स उभी राहिली आहेत. काही दिवस उत्तम राहण्याचीही सोय असणारी हॉटेल्स या परिसरात तयार होऊ लागले आहेत. पर्यटक सध्या सुट्टीच्या दिवशी व रविवारी मोठी गर्दी करू लागले आहेत.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवून, किनाऱ्यावर जीव रक्षकांचीही तैनात करण्यात आलेली आहे. तसेच अनेक ठिकाणी सावधानतेचे फलकही लावण्यात आलेले आहेत. मेरिटाईम बोर्ड आणि ओएनजीसीने या किनाऱ्यावर असलेली जेटी साफ करण्याचे काम सुरू केले आहे. ते पूर्ण झाल्यानंतर किनाऱ्यांवरील जागेत वाढ होणार असल्याने विस्तारलेल्या किनाऱ्यावर अधिक पर्यटकांना सामावून घेण्याची क्षमताही वाढणार आहे.