कोकण रेल्वे दुपदरीकरण आणि विद्युतीकरणास ३१ ऑक्टोबरपासून प्रारंभ करण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी केली. कोकण रेल्वेच्या रौप्य महोत्सव वर्षांनिमित्त वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात ते बोलत होते.
कोकण रेल्वे कोकणातील बंदरांना जोडण्याचा मनोदय व्यक्त करीत कोकण रेल्वेची प्रवासी क्षमता आणि त्यायोगे उत्पन्न वाढणार असल्याचा दावाही प्रभू यांनी केला. कोकण रेल्वे मार्गावरील विविध सुधारणांसाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी खर्च होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. स्थानिक महिलांना रोजगार मिळावा म्हणून कोकणातील खाद्यपदार्थ रेल्वेत उपलब्ध केले जातील. तसेच कोकणातील रिक्षा-टॅक्सीचालकांना पर्यटन मार्गदर्शकाचे प्रशिक्षण देऊन कोकणचा पर्यटन विकास व रोजगार वाढविणार असल्याचे प्रभू म्हणाले. या कार्यक्रमाप्रसंगी कोकण रेल्वे विकासाला योगदान देणाऱ्या कर्मचांऱ्याचा सन्मान करण्यात आला.
या वेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य रेल्वेमंत्री मनोज सिन्हा, कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक भानुप्रताप तायल उपस्थित हेाते. या वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या वेतनाइतकाच बोनस देणार असल्याची घोषणा प्रभू यांनी केली.