News Flash

‘एपीएमसी’तील व्यापाऱ्यांत अस्वस्थता

एपीएमसीचे पाचही घाऊक बाजार सुरू ठेवण्याचे आदेश सरकारने या व्यापाऱ्यांना दिले.

संग्रहित छायाचित्र

गदीमुळे संसर्गाची भीती; व्यापार नोकरांच्या हाती

नवी मुंबई : परवाने रद्द करण्याचा इशारा राज्य शासनाने दिल्याने नाइलाजास्तव एपीएमसीच्या पाच बाजारांतील घाऊक दुकाने सुरू ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये मसाला बाजारातील एका व्यापाऱ्याला करोना विषाणूची लागण झाल्याने चांगलीच अस्वस्थता परसली आहे. अत्यावश्यक सेवेत मोडणारा धान्य, कांदा, बटाटा आणि भाजीपाला घाऊक बाजार सोमवारपासून बंद राहणार होता, पण शासनाच्या आदेशामुळे तो पुन्हा सुरू केला असून यात धान्य बाजारातील व्यापारी विश्वासू नोकरदारांच्या हवाली दुकाने करून स्वत:ला घरात बंदिस्त करुन घेणार असल्याची चर्चा आहे.

एपीएमसीचे पाचही घाऊक बाजार सुरू ठेवण्याचे आदेश सरकारने या व्यापाऱ्यांना दिले. बाजारातील दुकाने सुरू न ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा शासनाला दिल्याने व्यापाऱ्यांना ह्य़ा बाजारपेठा सुरू ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. फळ व कांदा बटाटा बाजारात सामाजिक अंतर सांभाळून प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या गेल्या होत्या, मात्र भाजी बाजारात दररोज भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या खरेदीदारांची संख्या हजारोने असल्याने या ठिकाणी सामाजिक अंतराची धूळदाण उडाली असल्याचे चित्र होते. त्यामुळे हा बाजार खारघरला हलविण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. एपीएमसी बाजार समितीने नंतर सामाजिक अंतराची काटेकोर अंमलबजावणी करून हा व्यापार सुरू ठेवला आहे. जीवनावश्यक वस्तूंची आवक जावक सुरुळीत सुरू असतानाच मसाला बाजारातील एका व्यापाऱ्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आणि सर्वच व्यापारी हादरून गेले. त्यामुळे जीवापेक्षा व्यापार महत्त्वाचा नाही म्हणत सोमवारपासून जास्त वर्दळीचे हे तीन बाजार बंद करण्याचा आग्रह व्यापाऱ्यांनी शासनाकडे धरला होता, पण जीवनावश्यक वस्तू पुरवठा करण्याची हमी देणाऱ्या सरकारने ह्य़ा पाचपैकी दोन बाजारपेठा बुधवारपासून पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. भाजी व धान्य बाजारातील व्यापाऱ्यांच्यात यामुळे अस्वस्थता पसरली आहे.

घरबसल्या व्यापार

या बाजारातील व्यापाऱ्यांकडे गेली अनेक वर्षे काम करणारे प्रामाणिक नोकरदार मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यांच्या हवाली ही दुकाने करून मालकही घरात बंदिस्त करुन घेणार आहेत. अनेक मालकांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने घरबसल्या व्यापार करणे शक्य झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 2:38 am

Web Title: traders in apmc market feel discomfort due to coronavirus infection zws 70
Next Stories
1 Lockdown: बाजारपेठा ठप्प झाल्याने शेतकऱ्यांचा भाजीपाला झाला जनावरांचा चारा
2 हापूस आंब्याच्या थेट विक्रीला ग्राहकांचा प्रतिसाद
3 भाजीपाला थेट सोसायटीत ; नवी मुंबई महापालिकेचे नियोजन
Just Now!
X