पुनम धनावडे

सेक्टर १९ परिसरात दुकानदारांकडून वाढीव जागेचा वापर, पदपथावर चालणेही अवघड

अनधिकृत बांधकाम, फेरीवाले, मार्जिनल जागेचा वापर करणाऱ्या व्यवसायिकांवर नवी मुंबई महानगरपालिकेने कारवाईची मोहीम हाती घेतली असली तरी, एपीएमसी सेक्टर १९ येथील बाजार आवारातील वाढीव जागेकडे मात्र पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या परिसरातील पदपथही गायब झाले असून या रस्त्यावरून चालनेही अवघड झाले आहे.

माथाडी भवन येथील बाजारात आधीच पार्किंगची समस्या आहे. हा रस्ता हा पाचही बाजाराला जोडला गेला आहे. त्यामुळे याठिकाणी वाहनांची वर्दळ असते. त्यात रस्त्यावरच पार्किंग असते. अशा परिस्थितीत येथील व्यापाऱ्यांनी आपला ‘बाजार’ वाढीव जागेत मांडून ठेवलेला आहे. यात इलेक्ट्रॉनिक, किराणा आणि करकोळ बाजार असून अनेक प्रकारची दुकान आहेत. या व्यावसायिकांनी ‘आपले हात पाय पसरत’ मार्जिनल जागेत ही दुकाने थाटली आहेत. यामुळे येथी पदपथवरून चालनेही अवघड झले आहे. तत्कालीन आयुक्त मुंढे यांच्या काळात कारवाई करण्यात आली होती. परंतु आता पुन्हा तीच परिस्थिती आहे.

सध्या नवरात्रोत्सवाच्या खरेदीसाठी  नवी मुंबईसह मुंबईचा  उपनगरातून लोक येत असल्याने मोठी गर्दी होत आहे.  यासंबंधी अतिक्रमण विभागचे अधिकारी अमरीश पटनिगीरी तसेच तुर्भे विभाग अतिक्रमण अधिकारी यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता, संपर्क झाला नाही.

१०४ मार्जिनल स्पेसवर दंडात्मक कारवाई

शहरातील आठही विभागांत फेरीवाले व मार्जिनल जागेचा वापर करणाऱ्या दुकानधारकांवर कारवाई केली जात आहे. यात एकूण ४२१ अनधिकृत फेरीवाल्यांवर व १०४ मार्जिनल स्पेस वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात माल जप्तीसोबतच ४ लाख ६४ हजार ५०० रुपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. याआधीही १ ऑक्टोबर रोजीही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. यामध्ये १२७ अनधिकृत फेरीवाल्यांवर व २२८ मार्जनिल स्पेसवर कारवाई करण्यात आली होती. यात ८ लाख ८ हजार २०० इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली होती.