X

अपघातामुळे दीड तास वाहतूक कोंडी

कामोठे येथील उड्डाणपूल व कळंबोली येथील उड्डाणपुलाजवळ मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास दोन अपघात झाले.

महामार्गावर १५ वाहनांची धडक

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर कामोठे व कळंबोली येथे मंगळवारी झालेल्या दोन विचित्र अपघातांमुळे हजारो वाहनांच्या रांगा लागल्या. या अपघातामुळे दीड तास, सुमारे पाच किलोमीटपर्यंत वाहतूककोंडी झाली होती. कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांची तारांबळ उडाली.

कामोठे येथील उड्डाणपूल व कळंबोली येथील उड्डाणपुलाजवळ मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास दोन अपघात झाले.  सुरुवातीला कामोठे येथील उड्डाणपुलाजवळ पुणे मार्गावर येणाऱ्या एका गाडीला कामोठे वसाहतीमधून बेकायदा वळसा घेणाऱ्या वाहनाने ठोकर दिली. त्यानंतर पाठोपाठ असणाऱ्या स्विफ्ट गाडीने त्या अपघातग्रस्त वाहनांना धडक दिली. लागोपाठ येणाऱ्या पाच वाहनांची एकमेकांना धडक बसली. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले व कोंडी झाली. ही कोंडी कळंबोलीपर्यंत पोहोचली. त्याच सुमारास कळंबोली येथेही अपघात झाला आणि या अपघातही एकापाठोपाठ येत आसलेल्या दहा वाहनांना परस्परांची धडक बसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पंधरा वाहने एकमेकांवर धडकल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. लागोपाठ तीन दिवसांच्या सुटय़ा संपल्यानंतर मंगळवारी कार्यालयात हजर होण्यासाठी निघालेल्यांना या वाहतूक कोंडीची झळ बसली.

  • Tags: traffic-congestion,
  • Outbrain