घणसोली, तुर्भेतील उड्डाणपूल दृष्टिपथात; महापेतील भुयारी मार्गही पूर्ण होणार!

ठाणे-बेलापूर मार्गावरील घणसोली व तुर्भे येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. तर महापे सर्कलजवळ भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, नवीन वर्षांत उड्डाणपुलाचे तसेच महापे येथील भुयारी मार्गाचे काम पूर्ण होण्याची आणि त्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

घणसोली नाका परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याने या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. १.४ किलोमीटर लांबीच्या या पुलाचे काम प्रगतिप्रथावर आहे. या वर्षांत हे काम मार्गी लागणार असल्याने येथील वाहतूक कोंडी फुटणार आहे. सविता केमिकल येथेदेखील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्याचे कामही या वर्षांत पूर्ण होणार असल्याने ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी दूर होण्याची शक्यता आहे.

महापे सर्कल येथे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने एमएमआरडीएने येथे भुयारी मार्गाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे ठाणे दिशेकडून कोपरखरणेकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहने समांतर रस्त्यावरून सोडण्यात येत आहेत. परिणामी समांतर रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडी होते. अवजड वाहनांना घणसोलीकडून एमआयडीसी रस्त्यामार्गे बेलापूरच्या दिशेने प्रवास करावा लागतो. त्यामुळे महापे येथील भुयारी मार्गाचे काम झाल्यानंतर या वाहनांना दिलासा मिळणार आहे. मे महिन्यापर्यत या भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

महापे ते ऐरोली प्रवास सोपा होणार!

क्षेत्रातील मुंब्रा बायपास रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अवजड वाहने ऐरोली-मुलुंड पुलामार्गे एक दिवसाआड दुपारी सोडण्यात येतात. त्यामुळे ऐरोली-मुलुंड पुलापासून रबाळेपर्यंत अजवड वाहनांमुळे एक दिवसाआड कोंडी होते. मुंब्रा बायपासचे काम एप्रिलपर्यंत होणार असून या रस्त्याचे काम झाल्यांनतर अवजड वाहने ही मुंब्रा मार्गे उरण जेएनपीटीकडे जाणार आहेत. त्यामुळे यातून नवी मुंबईकरांची सुटका होणार आहे.

मुकंद कंपनी ते रबाळे काँक्रीटीकरण 

एमआयडीसीमधील अंतर्गत रस्त्यांचे काम करण्यात येत आहे. महापेपासून रबाळेपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे, मात्र रबाळेपासून मुकंद कंपनीपर्यंतचे काम रखडले आहे. रबाळेपासून मुकंद कंपनीपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. २०१८ पर्यंत या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.