मुंब्रा-पनवेल मार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका महाविद्यालयीन आणि शाळकरी विद्यार्थ्यांना गुरुवारी सकाळी बसला. राज्य परिवहन मंडळाची बस वाहतूक कोंडीत अडकल्याने विद्यार्थ्यांना दीड किलोमीटपर्यंत पायपीट करावी लागली.

मुंब्रा-पनवेल महामार्गावर रोजच  वाहतूक कोंडी होत असते. गुरुवारी सकाळी वाहतूक कोंडीचा अंदाज आल्यानंतर चालक आणि वाहकांनी गाडीतील विद्यार्थ्यांना कोंडीचे कारण देत उतरवले. त्यानंतर पडघा गावमार्गे बसचा प्रवास सुरू केला. वाहतूक पोलीस चौकी ते नावडे फाटा अशी तब्बल २५ मिनिटे पायपीट करावी लागली.

मुंब्रा-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण आणि उड्डाणपुलाचे काम नावडा फाटा येथे सूरु आहे. याच रस्त्यावर नावडे गाव येथे रस्त्याला खड्डे पडले आहेत. तर नावडे गाव येथे रस्ता ओलांडणारे प्रवास व वाहनांची संख्या वाढल्याने नावडे फाटा ते रोडपाली सिग्नलदरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. तळोजा वाहतूक पोलिसांनी येथे पाच कर्मचारी नेमले असले तरी येथील वाहतूक कोंडी सोडविता येत नाही.

हायकल ते पनवेल या एसटी बसमधील चालक आणि वाहकाने वाहतूक कोंडीमुळे बस अध्र्या वाटेतच थांबवून बसमधील २५ विद्यार्थ्यांना उतरवले. इतर प्रवाशांनी  तिकिटेही काढली होती. हायकल ते पनवेल या बसने नावडा फाटा मार्गे नावडा गाव येथून रोडपाली सिग्नल असा प्रवास करणे अपेक्षित होते. मात्र कोंडीची माहिती मिळाल्यावर तळोजा औद्योगिक वसाहतीमधील देना बँकेच्या पुढील बसथांब्यावर विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचे कारण देण्यात आले. बसमधील निम्मे प्रवास याच चौकीजवळ उतरवून राज्य परिवहन मंडळाच्या बसने पडघा गावाच्या मार्गाने रोडपाली लिंकरोडच्या दिशेने प्रवास सुरू केला.

प्रवाशांना त्यांच्या बसथांब्यापर्यंत सुखरूप सोडण्याची जबाबदारी एसटीचालक व वाहकांची आहे. विद्यार्थ्यांना जर तिकीट देऊनही कोंडीच्या कारणास्तव मध्येच उतरवले गेले असेल तर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल. तथ्य आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

– श्रीमती एम. पी. वानखेडे, वरिष्ठ व्यवस्थापक, पनवेल आगार