वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

नवी मुंबई : नवी मुंबईत अद्याप वाहतूक व्यवस्था सुरळीत आहे, मात्र बेशिस्त चालकांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी व अपघातांच्या घटना घडत आहेत. त्यामुळे गायक, संगीतकार शंकर महादेवन यांनी शुक्रवारी स्वत: वाशीतील शिवाजी चौकात वाहतूक नियंत्रण केले.  त्यांनी नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांचे प्रबोधन करीत त्यांना गुलाब देण्यात आले.

राज्यात सध्या वाहतूक पोलिसांचा ‘सुरक्षा सप्ताह’ सुरू आहे. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहनचालकांचे वाहतूक नियमांबाबत प्रबोधन व्हावे यासाठी या सप्ताहात एक उपक्रम हाती घेतला आहे. त्यात एक दिवस पोलिसांसमवेत असा उपक्रम असून यात विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व सेलिब्रेटींना बोलावण्यात येणार आहे. शुक्रवारी गायक, संगीतकार शंकर महादेवन यांनी वाशीतील शिवाजी चौकात वाहतूक पोलिसांसमवेत वाहतूक नियंत्रण केले. ते नवी मुंबईचे रहिवाशीही आहेत. त्यामुळे त्यांनी अत्यंत उत्साहाने एक दिवस वाहतूक पोलिसांची भूमिका पार पाडली.

या वेळी झालेल्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, सहआयुक्त जय जाधव, बी.पी. शेखर पाटील, उपायुक्त सुरेश मेंगडे, पुरुषोत्तम कराड आदी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. या वेळी शंकर महादेवन यांनी गायलेल्या गाण्यांनी या कार्यक्रमाला बहार आणली.

वाहन चालवताना हेल्मेट, सुरक्षा पट्टा बंधनकारक आहे. वेगमर्यादेचे पालन करावे याचे महत्त्व मलाही पटले व मी ते वाहनचालकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. हा उपक्रम अतिशय चांगला आहे. यामुळे वाहतूक पोलीस आणि सामान्य व्यक्ती यांच्यातील संवादही वाढू शकतो.

– शंकर महादेवन, गायक, संगीतकार