हेल्मेटसक्तीला धुडकावणाऱ्या ५५ हजार ७२९ दुचाकीस्वारांवर वाहतूक विभागाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ८ लाख १८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतुकीचे नियम मोडण्याच्या घटनांमध्ये गेल्या वर्षी पेक्षा १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाहतुकीचे ११ प्रकारचे नियम मोडल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. यात १७ लाख ७७ हजार रुपये इतकी रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली आहे. मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षी एक हजार ८११ इतकी होती, तर २०१४ मध्ये ही संख्या एक हजार १०४ इतकी होती. वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची संख्याही ८७ टक्के वाढली आहे. १५९३ जणांवर अशी कारवाई करण्यात आली आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त अरिवद साळवे यांनी सांगितले. पोलिसांनी आता या वाहनधारकांना वाहतुकीचे नियम समजावण्यासाठी वाहतूक सुरक्षा अभियान हाती घेतले आहे. सुमारे पंधरा दिवस हे अभियान संपूर्ण नवी मुंबईमध्ये राबविले जाणार आहे. या वेळी पोलीस आयुक्त प्रभात रंजन, वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त अरविंद साळवे, वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष पवार व सर्व पोलीस आधिकारी हजर होते. या पंधरा दिवसांत शालेय स्तरांवर विविध स्पर्धा, महिला दुचाकीचालकांची जनजागृती फेरी, कार फेरी, हेल्मेट फेरी, आरोग्य शिबीर, वाहतूक कार्यशाळा मार्गदर्शन पुस्तिका वाटप, शालेय विद्यार्थी वर्गाला वाहतूक नियम माहिती शिबीर रस्ता सुरक्षा आदी विषयांवर माहिती दिली जाणार असून या अभियानाचा समारोप २२ जानेवारी रोजी कळंबोली येथील मुख्यालयात होणार आहे.