03 March 2021

News Flash

बेकायदा बाजारांमुळे कोंडी

आठवडे बाजारांचे व्हिडीओ चित्रीकरण करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तयारी त्या वेळी केली होती.

शिरवणे येथील बेकायदा आठवडे बाजार (छायाचित्र- नरेंद्र वास्कर)

संतोष जाधव

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा कानाडोळा

नवी मुंबईतील पदपथ फेरीवालेमुक्त या तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धोरणामुळे पदपथ नागरिकांसाठी खुले झाले होते, परंतु आता बेकायदा आठवडे बाजारांनी पुन्हा पाय पसरले आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.  पालिका हद्दीतील घणसोली, शिरवणे, दारावे, तुर्भे, ऐरोली बेलापूरसह विविध ठिकाणी हे बेकायदा आठवडे बाजार भरतात.

आठवडे बाजारांचे व्हिडीओ चित्रीकरण करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तयारी त्या वेळी केली होती. परंतु मुंढे गेल्या पालिकेच्या अतिक्रमण विभागाला याचा विसर पडला आहे. त्यामुळे आठवडे बाजारात मानखुर्द, गोवंडी भागातून फेरीवाल्यांची सातत्याने वाढ होत असून आयुक्तांनी कडक भूमिका घेऊन कारवाईची मागणी होत आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या व वॉर्डनिहाय जुजबी कारवायांमुळे आठवडे बाजार विस्तारत आहेत.

नवी मुंबई शहरात मूळ गावठाणे व विकसित नोड मिळून नवी मुंबईची निर्मिती झालेली आहे. नवी मुंबई शहरात गावठाणांनजीक तसेच झोपडपट्टी विभागामध्ये बेकायदेशीर आठवडा बाजार भरतात. पालिकेच्या अतिक्रमण विभागाने विविध ठिकाणच्या आठवडे बाजारावर कारवाई केली आहे. पंरतु कारवायानंतरही फेरीवाले व आठवडे बाजार पुन्हा सुरू होत आहेत.

फेरीवाले पदपथ आडवतातच त्याशिवाय रस्त्याचा काही भागही व्यापतात. या बाजारातूनच एनएमएमटी व इतर बसेस धावतात. परंतु बाजारामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. या बाजारात भुरटय़ा चोरांचे फावले असून महिला व मुलींच्या छेडछाडीचे प्रकारही घडत आहेत.

फेरीवाल्यांकडून ठरावीक भाडेही  घेतले जात असल्याने गोवंडी व मानखुर्द परिसरातून येणारे फेरीवाले एका आठवडे बाजारात बसण्यासाठी १०० रुपयांपासून ते ५०० रुपये उकळले जात असल्याचे फेरीवाल्यांनीच सांगितले. स्वस्त दरात वस्तू मिळतात या आशेने ग्राहकांचीही प्रचंड गर्दी असते.

प्रमुख बेकायदेशीर आठवडे बाजार

* घणसोली गाव : रविवार

*  शिरवणे गाव : रविवार

*  तुर्भे नाका : रविवार

*  बेलापूर : शनिवार

*  दारावे :  मंगळवार

*  बुधवार : घणसोली सिम्प्लेक्स परिसर

विभाग क्षेत्रात भरणाऱ्या आठवडे बाजाराबाबत सातत्याने कारवाई करण्यात येते. रविवारी शिरवणे येथील बाजारातही कारवाई करण्यात आली. यापुढेही आठवडे बाजार व अनधिकृत फेरीवाल्यांबाबत कारवाई करण्यात येईल,

– संजय तायडे, विभाग अधिकारी, नेरुळ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2018 3:23 am

Web Title: traffic due to illegal markets
Next Stories
1 तळोजा कारागृहातून ३७ कैद्यांची मुक्तता
2 घणसोलीत प्लास्टिक वापरणाऱ्या सात दुकानांवर कारवाई
3 पालिकेची चिक्कीची आवड संपेना!
Just Now!
X