|| संतोष जाधव

अपघात, वाहतूकोंडीमुळे दोन दिवसांत दोघांचा मृत्यू

शीव-पनवेल महामार्गावर दर पावसाळ्यात तुर्भे परिसर, वाशी टोलनाका ते बेलापूर, खारघर, कळंबोली परिसरात व उड्डाणपुलांवर पडणाऱ्या खड्डय़ांमुळे प्रवासी हैराण झाले असून या मार्गावर गेल्या काही दिवसांत दोघांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एकाला अपघातात तर दुसऱ्याला रुग्णवाहिका कोंडीत अडकून पडल्याने जीव गमावावा लागला आहे.

शीव-पनवेल महामार्गावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या मार्गाला समांतर असलेल्या नेरुळ एलपी ते उरण फाटय़ापर्यंतच्या रस्त्यावरही खड्डे पडल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ खडी टाकून वरवरची मलमपट्टी करत आहे.

गेल्या वर्षीही पावसाळ्यात या महामार्गाची अशीच दुरवस्था झाली होती. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये झालेल्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेपूर्वी खासदार राजन विचारे व तत्कालीन महापौर सुधाकर सोनावणे यांनी या रस्त्याची पाहणी केली होती. तुर्भे ते सानपाडा तसेच तुर्भे नाका ते तुर्भे स्टोअर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते, मात्र दमदार पावसाने या कामाचे पितळ उघडे पाडले आहे. संपूर्ण रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

फुटबॉल स्पर्धेच्या वेळीच पालिकेने वाशी ते बेलापूर दरम्यानचा १४ किलोमीटरचा महामार्ग हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव संमत करून राज्य शासनाला पाठवला होता, मात्र तो लाल फितीत अडकला आहे. त्यामुळे महामार्गावरील खड्डय़ांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे, त्यांनी खड्डे बुजवावेत, असा पवित्रा पालिकेने घेतला आहे.

शुक्रवारी बेलापूर येथील उड्डाणपुलाखालील चौकात खडी टाकून खड्डे बुजवण्याचे काम सुरू होते. त्यामुळे तिथे वाहतूक कोंडी झाली होती. ही कोंडी नित्याचीच झाली आहे. पाच मिनिटांच्या प्रवासाला तब्बल अर्धा तास लागत आहे. हा महामार्ग राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच असल्यामुळे या रस्त्यावरील देखभाल दुरुस्तीची जबाबदारी राज्य शासनाची आहे. वाहतूक कोंडी व अपघात कमी व्हावे यासाठी शासनाने २५ किमी लांबीच्या शीव-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण केले आहे. त्यासाठी १२०० कोटींपेक्षा जास्त खर्च झाला आहे. तरीही दर पावसाळ्यात खड्डे पडत आहेत. ठेकेदार व शासनाच्या वादात प्रवासी भरडले जात आहेत.

बुधवारी तुर्भे येथील ४६ वर्षीय शंकर भुतनूरे या वाहनचालकाला रुग्णवाहिकेतून वाशी येथील पालिकेच्या रुग्णालयात नेण्यात येत होते. रुग्णवाहिका शीव-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडीत सुमारे अर्धा तास अडकून पडली. त्यामुळे उपचार मिळण्यास उशीर झाला आणि पोहोचेपर्यंतच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती तुर्भे येथील रहिवाशांनी दिली.

बुधवारी तुर्भे परिसरातील एका नागरिकाला उपचारांसाठी वाशी येथील पालिका रुग्णालयात रुग्णवाहिकेतून नेण्यात येत होते. खड्डय़ांमुळे कोंडी झाली होती. त्यामुळे पोहोचण्यास उशीर झाला व रुग्ण दगावला. आणखी किती बळी जाण्याची वाट सार्वजनिक बांधकाम विभाग पाहणार आहे, असा प्रश्न तुर्भे येथील शिवसेना शाखाप्रमुख महेश कोठीवले यांनी केला.

उरण फाटय़ाजवळ पडलेल्या खड्डय़ात दुचाकी अडकून पडल्यामुळे तळोजा येथील इब्राहिम खुर्शीद यांचा गुरुवारी मृत्यू झाला. या रस्त्याच्या स्थितीबाबत माहिती घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद देण्यात आला नाही.

शीव-पनवेल मार्गावरील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत विधानसभेत आवाज उठवला आहे. निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.    – मंदा म्हात्रे, आमदार

फुटबॉल स्पर्धेच्या वेळी महापौर, पालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांसह पाहणी केली होती. डांबरीकरण करण्यात आले. एवढय़ा लवकर रस्ता खराब होत असेल तर कंत्राटदाराला जाब विचारण्याची गरज आहे. पुन्हा पाहणी करणार आहे.   – राजन विचारे, खासदार

बेलापूर ते वाशीपर्यंतच्या रस्त्यावर पावसाळ्यात नेहमीच खड्डे पडतात. त्यामुळेच पालिकेची विनाकारण बदनामी होते. पालिकेच्या हद्दीतील १४ किमी महामार्ग हस्तांतरित करावा, असा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे, परंतु अद्याप मंजुरी मिळालेली नाही. खड्डय़ांची जबाबदारी संबंधित विभागाची आहे. नेरुळ एलपीजवळील समांतर रस्त्याचे काम मंजूर झालेले आहे. ते काम लवकरच करण्यात येईल.     – मोहन डगावकर, शहर अभियंता नवी मुंबई महापालिका