दुतर्फा गाडय़ा उभ्या केल्याने वाहतूककोंडी

सण असला की वाशी मार्केट परिसरात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब. त्यामुळे दिवाळीत या रस्त्यावर तात्पुरते ‘नो पार्किंग झोन करण्यात आला आहे. मात्र या योजनेचा फज्जा उडाला आहे. बिनदिक्कत दुतर्फा गाडय़ा पार्क केल्या जात असल्याने वाहतूककोंडीपासून सुटका झालेलीच नाही.

वाशी सेक्टर ९, १०, १४ आणि १५ चा जो भाग वाशी कोपरखैरणे रस्त्यावर येतो, त्या ठिकाणी सण असेल तर खरेदीसाठी झुंबड उडत असते. या ठिकाणी अलिशान वातानुकूलीन दुकानांपासून ते फुटपाथवर त्या त्या सणांना हवे ते एकाच ठिकाणी मिळत असल्याने खरेदीदार मोठय़ा प्रमाणात येत असतात. त्यामुळे या परिसराला गमतीने नवी मुंबईचे ‘दादर’ म्हटले जाते. या गर्दीत खरेदीदारांच्या दुचाकी व चारचाकी दुतर्फा पार्क केल्या जातात. विशेष म्हणजे गाडय़ांची पार्किंगही दुहेरी, तिहेरी केली जाते, त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या गाडय़ांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. गाडय़ा पार्क करून गाडीतच वाहनचालक बसलेला असतो. पाठीमागील गाडीचालक हॉर्न वाजवून थकतो, मात्र थांबलेला गाडीचालक त्याकडे दुर्लक्ष करीत असतो. त्यामुळे अनेकदा वादही होतात. अशा वाहनामुळे वाहतूककोंडी जास्त होते तर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली तर वाहनचालक बसलेला असता, नो पार्किंगचा दंड का आकारात असे उलट उत्तर दिल्याने पोलीस आणि वाहनचालाकातही वाद होत आहेत.

यावर तोडगा म्हणून वाहतूक पोलिसांनी ४ नोहेंबर ते ८ नोहेंबरदरम्यान सेक्टर ९, १०, १४ आणि १५ च्या मार्केट विभागात ‘नो पार्किंग’ झोन घोषित केला आहे. मात्र ते करताना गाडय़ा कुठे लावाव्यात हे सुचवलेलेच नसल्याने गाडया कुठेही लावल्या जात आहेत.

सूचनाफलक नाही

वाशी डेपो मागील पार्किंग आणि वाशी सेक्टर १६च्या नाल्यावरील पार्किंग जवळ आहे. मात्र या ठिकाणी गाडी पार्क करावी, अशी कुठलीही सूचना लावण्यात आलेली नाही. या रस्त्यावरून वाशी ते कोपरखैरणे दरम्यान वाहनांची संख्याही  प्रचंड आहे. याच खरेदी न करणाऱ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. वाशी डेपो ते वाशी सेक्टर १५ हे पायी दहा ते पंधरा मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी गाडीला किमान अर्धा तास लागतो.

एपीएमसीतही ‘कोंडी’ कायम

अशीच अवस्था कृषी उत्पन्न बाजार पेठेतील आहे. या ठिकाणी सजावटीचे साहित्य तसेच घरात लागणाऱ्या सर्व किरकोळ वस्तूंची दुकाने मोठय़ा प्रमाणावर आहेत.  यामुळे येथेही प्रचंड गर्दी होते. त्यामुळे या ठिकाणीही ‘नो पार्किंग’ झोन करण्यात आला असला तरी कोणीही नियम पाळत नसल्याचे दिसत आहे.

वाहतूककोंडी टाळण्यासाठी ‘नो पार्किंग’ झोन तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आला आहे. कारवाईत सातत्य असूनही कारवाई तीव्र केली जाईल. खरेदीदारांनी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे.     – अरुण पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त.