ठाणे-बेलापूर मार्गावर तळवली-घणसोली दरम्यान सुरू असलेल्या एमएमआरडीएच्या उड्डाणपुलांच्या कामामुळे सकाळ-संध्याकाळ मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यासाठी बांधकाम कंपनीने पश्चिम बाजूस असलेला पदपथ उखडून त्या ठिकाणी रस्ता तयार केला आहे. तरीही ही वाहतूक कोंडी कायम आहे. याच रस्त्याला समांतर असलेला एमआयडीसीतील रस्त्यावर वाहतुकीचे नियोजन न करण्यात आल्याने ही वाहतूक कोंडी जास्त प्रमाणात जाणवत आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावर दिवसाला सव्वा लाखाच्या घरात वाहने ये-जा करतात. त्यात या मार्गालगत असलेल्या गावांच्या वेशीवर बसविण्यात आलेल्या सिग्नलमुळे काही क्षणांत वाहतूक कोंडी होते. त्याला पर्याय म्हणून घणसोली, तळवली आणि पावणे येथील सविता केमिकल्सजवळ तीन उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव पालिकेने एमएमआरडीएपुढे ठेवला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्य केल्याने शिळफाटा मार्गावरील एका उड्डाणपुलानंतर एमएमआरडीएने या दीडशे कोटी रुपये खर्चाच्या तीन पुलांचे काम हाती घेतले आहे. उड्डाणपुलाच्या कामात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा पालिका आणि वाहतूक विभागाने आढावा घेऊन नियोजन न केल्याने अलीकडे सकाळ-संध्याकाळ तीन ते चार किलोमीटर रांगेची वाहतूक कोंडी या मार्गावर होत आहे. त्यासाठी एमआयडीसीत दिघा ते महापे दरम्यान बांधलेला एमआयडीसी मार्ग व ठाणे बेलापूर मार्गावरील समांतर सेवा मार्गाचे योग्य ते नियोजन केल्यास ही वाहतूक कोंडी फुटण्यास हातभार लागणार आहे.