दुपारनंतर वाहतूक सुरळीत; सानपाडय़ापर्यंत वाहनांचा रांगा

नवी मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी एका टेम्पोचे चाक निखळल्याने वाशी खाडीपुलावर प्रचंड वाहतूक  कोंडी झाली होती. त्यातच अन्य दोन छोटे अपघात झाल्याने या वाहतूक कोंडीत भर पडली. दुपारी १ नंतर वाहतूक पूर्ववत झाली.

सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेत वाशी खाडीपुलावर एका टेम्पोचे मागील चाक निखळले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. क्रेनच्या साह्य़ाने टेम्पो बाजूला काढणेही शक्य नव्हते. त्यामुळे अन्य दोन मार्गिकांमधील वाहतूक सुरू ठेवून वाहनांची संख्या कमी करण्यात आली आणि त्यानंतर टेम्पो रस्त्यातून हटविण्यात आला. या  काळात सानपाडय़ापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. सोमवार कामाचा दिवस असल्याने वाहनांची संख्या अधिक होती, अशी माहिती वाशी वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास खटावकर यांनी दिली.

आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. कल्याण-शीळ मार्गावरही सोमवारी वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे वाहनांची गती कमालीची मंदावली होती. त्यात अवजड वाहनांची संख्या अधिक असल्याने कार्यालय गाठणाऱ्या नोकरदारांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले.  सध्या शीळ फाटा आणि कल्याण फाटय़ादरम्यानच्या मार्गावर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले आहेत.

शरद पवार आणि टोल फायदा..

वाहतूक कोंडीत माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अडकल्याचे समजल्यानंतर वाहतूक पोलिसांची तारांबळ उडाली.  यावेळी शरद पवार आणि अन्य एका  वाहनात बडे नेते असल्याने वाहतूक कोंडीत अडकलेल्या या दोन गाडय़ा सोडवण्यासाठी पोलिसांनी मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या दोन मार्गिका मुंबईकडे जाणाऱ्या गाडय़ांसाठी मोकळ्या केल्या. तसेच गाडय़ा लवकर सुटाव्या म्हणून काही वेळ टोल वसुलीची बंद करण्यात आली. याचा फायदा वाहतूक कोंडी सुटण्यासाठी झालीच शिवाय अन्य ५० वाहन चालकांनाही फायदा झाल्याची माहिती एका वाहन चालकाने दिली.