वाशी, मुलुंड टोलनाक्यावर रांगा

नवी मुंबई : मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलच्या दरात १ ऑक्टोबरपासून वाढ करण्यात आली आहे. मात्र, याची कल्पना अनेक वाहनचालकांना नसल्याने टोल देण्यावरून वाद झाले. त्यामुळे वाशी, मुलुंड टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यात मनसेने मुलुंड टोलनाक्यावर आंदोलन केल्यामुळे कोंडीत भर पडली होती.

मुलुंड टोलनाका ते ऐरोलीपर्यंत तर वाशी गाव ते वाशी पुलापर्यंत वाहनांच्या रांगा होत्या. त्याचा फटका वाहन चालकांना बसला. वाशी येथे टोल नाक्यापासून एक ते दिड  किलोमीटरर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अशीच वाहतूक कोंडी ऐरोली टोल नाक्यावरही सकाळी ऐन गर्दीच्या वेळी झाली होती. सकाळी ९ नंतर येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र, या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना १० मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा तास लागत होता.

महानगरातील ५५ उड्डाणपूल उभारणीचा खर्च २५ वर्षे वसूल करण्यासाठी मुंबईच्या वेशीवर एमईपी कंपनीने टोलनाके उभारले आहे. या टोलनाक्यावर वाहनचालकांकडून टोल वसूली होते. राज्य रस्ते विकास महामंडळासोबत झालेल्या करारानुसार दर तीन वर्षांनी या टोलदरांमध्ये वाढ होत असते. त्यामुळे गुरूवार म्हणजेच, १ ऑक्टोबरपासून टोलदर वाढ

करण्यात आली आहे. वाहनचालकांना कल्पना नव्हती. त्यामुळे टोल वसुली करणारे आणि वाहन चालक यांमध्ये खटके उडत होते. त्यामुळे टोलनाक्यावर वाहतूक कोंडी होऊन त्याचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवर झाला.

कॉँग्रेसच्या आंदोलनामुळे महामार्गावर कोंडी

राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ नवी मुंबई काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक यांनी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली. तर शीव-पनवेल महामार्गावर शिरवणे येथे इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे सायंकाळी शीव-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या दोन्ही ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यावर वाहतूक सुरळीत केली. सकाळी मनसे आंदोलनामुळे मुलुंड टोलनाका परिसरात तर सायंकाळी कॉँग्रेसच्या आंदोलनामुळे शहरात वाहतूक कोंडी झाली होती.