पालिका ३०० कोटींचा खाडीपूल उभारणार

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडीवर उपाय ठरणारा घणसोली-ऐरोली पामबीच मार्गावर गेली १२ वर्षे रखडलेला खाडीपूल आता पालिका बांधणार असून त्यावर ३०० कोटी रुपये खर्च होणार आहे. या खर्चात सिडको अर्धा वाटा उचलणार आहे.

सिडकोचे या भागात विक्री योग्य मोठे भूखंड असल्याने हा खर्च सिडको करणार आहे. या पुलावर अगोदर ८०० कोटी रुपये खर्च करून तरंगता पूल बांधला जाणार होता, पण पालिका आता रस्त्याला जोडणारा सर्वसाधारण पूल बांधणार आहे.

नवी मुंबईतून ठाणे-बेलापूर व शीव-पनवेल हे दोन महामार्ग जात असल्याने नवी मुंबईत सध्या सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. यात नवी मुंबईतील वाहनांचीही भर पडत असल्याने या वाहतूक कोंडीवर पालिका विविध उपाययोजना करण्याचा प्रयत्न करीत आहे. घणसोली व ऐरोली या दोन महत्त्वाच्या उपनगरांना जोडणारा सिडकोने पामबीच विस्तार हा मार्ग बारा वर्षांपूर्वी बांधलेला आहे पण या मार्गात दोन किलोमीटर परिसरात खारफुटीचे मोठय़ा प्रमाणात जंगल असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या खारफुटी संरक्षण व संवर्धन आदेशामुळे सिडकोला या क्षेत्रात रस्त्याचे अथवा उड्डाणपुलाचे बांधकाम करता आले नाही. याच काळात सिडकोने डिसेंबर २०१६ मध्ये सिडको नोड पालिकेला हस्तांतरित केला, पण सिडकोची या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात विक्री योग्य भूखंड आहेत. त्यातून सिडकोला मोठा निधी मिळणार आहे. ऐरोली व घणसोली हे दोन्ही नोड आता पालिकेच्या अखत्यारीत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था या भूमिकेतून पालिकेला हा मार्ग जोडणे अपरिहार्य आहे. त्यामुळे माजी आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी खारफुटीला धक्का न लावता तंरगणारा खाडी पुल बांधण्याचा प्रस्ताव तयार केला होता. तो विद्यमान आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी रद्द केला असून वन विभागाची रीतसर परवानगी घेऊन सर्वसाधारपणे बांधण्यात येणारा पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी एका सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून ही कंपनी आराखडा तयार करणे, प्रकल्प व्यवस्थापन, अंदाज खर्च, वन व पर्यावरण विभागाच्या परवानग्या पाहणार आहे. त्यावर २९८ कोटी ९९ लाख रुपये खर्च होणार आहे. या खर्चाला आयुक्तांनी शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत प्रशासकीय मंजुरी मागितली आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावरील ताण कमी होणार

सिडकोने २० वर्षांपूर्वी वाशी ते बेलापूर हा ११ किलोमीटर लांबीचा पामबीच मार्ग तयार केलेला आहे. या मार्गाचा आज अंतर्गत वाहतुकीसह शीव-पनवेल मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून उपयोग केला जात असून शहराचा क्वीन नेकलेस मार्ग म्हणून विकसित करण्यात आला आहे. याच मार्गाला कोपरखैरणे येथून पुढे विस्तारित करताना घणसोली ऐरोलीतून तो मुलुंड ऐरोली खाडीपुलाला जोडला गेला आहे. यामुळे ठाणे बेलापूर मार्गावर पडणारा वाहतूकीचा ताण कमी होणार आहे. ठाणे व मुंबईकडे जाणाऱ्या अंतर्गत वाहतुकीला हा रस्ता मोठा दिलासा देणार आहे. त्यामुळे तो बांधण्याचा सिडको प्रयत्न करीत होती पण दोन किलोमीटरच्या खारफुटी जंगलामुळे हा रस्ता रखडला होता. पालिकेने पुढाकार घेतल्याने हा रस्ता येत्या काळात झाल्यास नवी मुंबईच्या वाहतुकीवर जालीम उपाय ठरणार आहे. घणसोली व ऐरोलीतील घरांचे दर वाढण्याची शक्यता जास्त आहे.