कांदा, हापूस, द्राक्ष खरेदी न करण्याचा निर्यातदारांचा इशारा

उरण येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) मधून देश विदेशात जाणाऱ्या नाशिवंत शेतमालाचे शेकडो कंटेनर करळ पुलापासून होणाऱ्या वाहतूक कोंडीमध्ये तासानतास अडकून राहात असल्याने अतिउष्णतेत शेतमाल खराब होत आहे. त्यामुळे यावर सरकारने वेळीच उपाययोजना न केल्यास घाऊक बाजारातील माल खरेदी न करण्याचा इशारा निर्यातदारांनी दिला आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

उरणच्या जेएनपीटी बंदरावर आयात-निर्यातीसाठी देश-विदेशातून सहा ते सात हजार कंटेनरची दररोज ये-जा सुरू आहे. ही संख्या दहा हजाराच्या घरातही जात आहे. येथील जेएनपीटी, जीटीआय आणि दुबई पोर्टवरून हा माल परदेशात पाठविला जातो. मोठय़ा प्रमाणातील कंटेनर वाहतुकीमुळे जेएनपीटीकडे जाणाऱ्या मार्गावर गव्हाण फाटय़ापासून वाहतूक कोंडीला सुरुवात होत असल्याचे चित्र आहे. या वाहतूक कोंडीत अनेक स्थानिक रहिवाशांचे जीव गेले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या या हजारो कंटेनरमध्ये भाज्या, फळ असा नाशिवंत मालही असतो. सध्या हापूस आंब्याची निर्यात मोठय़ा प्रमाणावर होत आहे. त्याचबरोबर द्राक्ष, डाळिंब, मिरची, पपई, लिंबू ही फळे व भाज्या निर्यात केल्या जात आहेत. त्यासाठी निर्यातदार वातानुकूलित कंटेनर वापरतात. प्रवासात ही यंत्रणा जनरेटरवर चालविली जाते, मात्र हे जनरेटर चार ते पाच तासापेक्षा जास्त काळ तग धरू शकत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर वाहनचालक ही यंत्रणा बंद ठेवतात.

गेल्या काही दिवसांपासून करळ पूल ते जेएनपीटी बंदरापर्यंत तीन ते चार किलोमीटरची कंटेनरची रांग लागून वाहतूक कोंडी होत आहे. कधी कधी १५-२० तास कोंडीत अडकल्यानंतर वाहनचालकाला बंदर प्रवेश दिला जातो, मात्र गोदामांमध्ये पुरेसे जनरेटर चार्जिग पॉइन्ट्स नसल्याने कंटनेरचालकांची पंचाईत होत आहे. या प्रवासात कंटेनरमधील नाशिवंत शेतमाल सडण्याची प्रक्रिया लवकर होत असल्याने त्याचा फटका निर्यातदारांना बसू लागला आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून एपीएमसीच्या घाऊक बाजारातून डाळिंब, हापूस आणि द्राक्ष यांची खरेदी न करण्याचा निर्णय काही निर्यातदारांनी घेतला आहे.

परस्थितीत बदल न झाल्यास हापूस आंबाही खरेदी न करण्याचा विचार निर्यातदार करीत आहेत. याचा परिणाम भावांवर होत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

मागील काही दिवसांपासून पनवेल-उरण मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्याचा फटका फळ व भाजी निर्यातदारांना बसू लागला आहे. त्यात जेएनपीटी बंदरात जनरेटर चार्जिग पॉइन्ट्स पुरेसे नाहीत. बुधवारी झालेल्या बैठकीत जेएनपीटी प्रशासनाने ५० पॉइन्ट्स वाढविण्याचे आश्वासन दिले आहे. बंदरावर हा नाशिवंत शेतमाल वेळीच न गेल्यास नाइलाजास्तव खरेदी बंद करावी लागेल. याचा फटाका शेतकऱ्याला बसेल.

अनंत शेजवळ, निर्यातदार, बॉम्बे एक्स्पोर्ट, नवी मुंबई</strong>