अरेंजा कॉर्नर ते कोपरी पुलासाठी निविदा; दोन वर्षांत उभारणी

नवी मुंबई : शहराचे मध्यवर्ती निवासी व वाणिज्यिक उपनगर असलेल्या वाशीमधील अरेंजा कॉर्नर ते कोपरी दरम्यान सकाळ संध्याकाळ होणारी मोठी वाहतूक कोंडी येत्या दोन वषरात सुटणार आहे. नवी मुंबई पालिकेने या ठिकाणी दोन किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला असून त्याची निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे. ठाणे, मुंबईकडे जाणारी वाहतूक याच मार्गाने पुढे जात असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होत असून हा शहरातील सर्वात मोठी उड्डाणपूल ठरणार आहे. नियोजित शहरात पन्नास वर्षांतच वाहतूक कोंडीची मोठी समस्या उभी राहू लागली आहे.

नवी मुंबईच्या चारही बाजूने वाहतूक मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला गळ घालून पालिकेने शहरात चार ठिकाणी उड्डाणपूल बांधून घेतलेले आहेत. शिळफाटा कल्याण मार्गावर होणाऱ्या मोठय़ा वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून ऐरोली ते कटई नाका दरम्यान बारा किलोमीटर लांबीचा मार्ग बांधला जात असून त्यासाठी पारसिक डोंगर पोखरुन दीड किलोमीटर लांबीचा रस्ता तयार होत आहे. गोवा, बंगळुरु, पुणे, जेएनपीटी या औद्योगिक क्षेत्राकडे जाणारे सर्व मार्ग हे नवी मुंबईतून जात असल्याने या वाहतूक कोंडीत दिवसेदिवस भर पडत आहे. सिडकोने वाशी ते बेलापूर हा ११ किलोमीटर लांबीचा पामबीच मार्ग २० वर्षांपूर्वी उभारल्याने शहरातील अंर्तगत वाहतूक कोंडीला पर्याय निर्माण झाला आहे. याच मार्गावरील वाशी येथे सेक्टर १७ मधील महात्मा फुले जंक्षन ते कोपरी उड्डाणपूलापर्यंत दोन किलोमीटर लांबीचा थेट उड्डाणपूल बांधण्याचा पालिकेने निर्णय घेतला असून यावर २६९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यासाठी मागील महिन्यात निविदा काढण्यात आली असून तिला करोनामुळे प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पालिकेने या निविदा भरण्यास २५ मार्चपर्यंत दुसरी मुदतवाढ दिली आहे. सुमारे पावने तीनशे कोटी रुपये खर्चाचा उड्डाणपूल दोन वर्षांत पूर्ण होणार असून त्यासाठी चांगल्या बांधकाम कंपन्या स्पर्धेत आहेत. हा उड्डाणपूल तयार झाल्यास वाशीच्या मध्यवर्ती भागात होणारी वाहतूक कोंडी फुटणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत या उड्डाण पुलाची गरज पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त केली असून दोन महिन्यात या कामाची निविदा काढण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी सिडकोकडून अर्ध्या निधीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे, मात्र सिडकोची आर्थिक स्थिती सध्या कमकुवत असल्याने सिडको या प्रकल्पासाठी निधी देण्याचा प्रश्न उद्भवणार नाही.

व्यावसायिकांची पंचाईत?

वाशी सेक्टर १७ ते कोपरी गाव या दोन किलोमीटर लांबीच्या उड्डाण पुलामुळे अनेक दुकानदारांच्या व्यवसायाचे तीनतेरा वाजणार आहे. या मार्गावर एक मोठा मॉलचा बाजार काही वर्षांपूर्वीच उठला आहे. मात्र या मॉलची जागा एका दुबईस्थित व्यावसायिकाने घेतली असून या ठिकाणी आयटी सेंटर उभे राहणार आहे. मात्र याच ठिकाणी मर्सिडिज या आलिशान गाडीच्या शो रूमपासून अनेक गाडय़ांचे शो रूम, हॉटेल, गाडय़ांचे सुटे पार्ट विकणारी दुकाने आहेत. या उड्डाण पुलामुळे थेट हा भाग वगळला जाणार असल्याने व्यावसायिकांचे कंबरडे मोडणार आहे.

नियोजित शहरात वाहतूक कोंडी

नवी मुंबई हे एक नियोजनबद्ध शहर ओळखले जाते. मात्र येथील वाहतूक मोठय़ा प्रमाणात वाढल्याने उड्डाण पुलांचा उतारा स्थानिक प्रशासनांना शोधावा लागला आहे. बांधकाम विभागाने शीव पनवेल महामार्गावर सहा उड्डाण पूल बांधलेले आहेत, तर एमएमआरडीएने चार उड्डाणपूल ठाणे-बेलापूर व शिळफाटा मार्गावर उभारलेले आहेत. नवी मुंबई पालिकेनेही अंर्तगत उड्डाणपूल बांधले असून वाशी ते कोपरी हा या साखळीतील सर्वात मोठा पूल असणार आहे. शहराच्या उभारणीला ५० वर्षे पूर्ण झाली असली तरी मागील ३० ते ३५ वर्षांतच शहरात उड्डाण पुलांची साखळी निर्माण करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हेच काय ते नियोजन असा सवालही नियोजनकार व्यक्त करीत आहेत.