रेल्वेसेवा तासभर ठप्प; ऐरोली-ठाणे स्थानकांदरम्यान बिघाड

रेकमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा शुक्रवारी दुपारी ठप्प झाली होती. वाशीवरून ठाण्याकडे जाणारी लोकल प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानकाजवळील संजय गांधीनगर परिसरात आली असता दुपारी अडीच वाजता हा बिघाड झाला. यामुळे या प्रवाशांचे हाल झाले.

रेल्वे प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत दुरुस्ती केल्यानंतर ही गाडी ठाण्याकडे मार्गस्थ झाली. त्यानंतर एका तासाने या मार्गावरील रेल्वेसेवा सुरळीत झाली.यामुळे ठाणे ते पनवेल तसेच ठाणे ते वाशी या मार्गावरील रेल्वे स्थानकांत प्रवाशांची गर्दी झाली होती. ठाण्याहून वाशी-पनवेलकडे जाणारी दोन्ही बाजूची वाहतूक बंद होती. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल झाले. अनेकांनी रेल्वेमधून उतरत ठाणे-बेलापूर महामार्ग गाठला, तर अनेकांनी एनएमएमटी, एस.टी. तसेच रिक्षा, खासगी वाहनांच्या मदतीने पुढील प्रवास केला.

याचा फायदा घेत रिक्षाचालकांकडून जास्तीचे भाडे आकारण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. दोन्ही दिशेची रेल्वे वाहतूक बंद असल्यामुळे अनेकांनी कुर्ला स्थानकावरून ठाणे गाठले. नेरुळ, जुईनगर, तुर्भे, कोपरखैरणे, ऐरोली, घणसोली, रबाळे या स्थानकांवर प्रवाशांचा खोळंबा झाला होता.

ट्रान्स हार्बर मार्गावरून वाशीवरून ठाण्याकडे जाणारी लोकल ऐरोली ते ठाणे स्थानकांदरम्यान रेकमध्ये तांत्रिक अडचण आल्यामुळे दुपारी २.३० ते ३.३० दरम्यान १ तास या मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. दुपारनंतर सेवा पूर्ववत झाली.- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

ठाणे-वाशी व ठाणे-पनवेल या दोन्ही मार्गावर रेल्वे सेवेचा खोळंबा झाल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. रुळावरून महामार्गावर  येत खासगी वाहनाच्या मदतीने नेरूळपर्यंत प्रवास करावा लागला. यात तासभर वेळ गेला. -गणेश कांबळे, रेल्वे प्रवासी