तीनदा स्मरणपत्रे देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

शहरातील सर्व मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून ते सुस्थितीत ठेवणाऱ्या नवी मुंबई पालिकेला शीव-पनवेल महामार्गाचा काही भाग देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग त्यात चालढकल करत आहे. पालिकेने यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला तीन स्मरणपत्रे दिली आहेत. खड्डे आणि कोंडीने प्रवासी त्रस्त झाले असूनही पावसाळा संपत आला तरी यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही.

मानखुर्द ते पनवेल या २३ किलोमीटर अंतराच्या शीव-पनवेल महामार्गाचे पाच वर्षांपूर्वी बाराशे कोटी रुपये खर्च करून क्राँक्रीटीकरण करण्यात आले. पुनर्बाधणी करणाऱ्या कंत्राटदराला कळंबोली येथे टोलनाका बांधून वसुलीची मुभा देण्यात आली होती, मात्र विरोध वाढल्याने नंतर छोटय़ा वाहनांसाठी टोल बंद करण्यात आला. हा टोल बंद झाल्याने कंत्राटदाराने रस्त्याची वार्षिक डागडुजी करण्यास नकार दिला. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. या रस्त्यावरील खड्डे प्रवाशांसाठी तापदायक ठरत आहेत. मार्गावरील उड्डाणपूल तर खड्डय़ात गेले आहेतच, मात्र त्यांच्या दुर्तफा वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे दिसते.

तुर्भे, सानपाडा, शिरवणे, सीबीडी, कोपरा येथील खड्डय़ांमुळे वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण झाले आहेत. खड्डय़ांमुळे एका तरुणाचा जीव गेला तर एका कंत्राटदावर गुन्हा दाखल झाला आहे. नवी मुंबई पालिका हद्दीतून जाणाऱ्या या रस्त्यातील १९ किलोमीटरचा भाग पालिकेकडे देण्यात यावा, अशी मागणी पालिका प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दोन महिन्यांपूर्वी केली, पण त्याला साधे उत्तर देण्याचे सौजन्यही सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप दाखविलेले नाही. पालिका क्षेत्रातून जाणाऱ्या या रस्त्याची काळजी घेण्यास पालिका तयार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. याच भागातील विद्युत खांबांवरील जाहिरती तसचे फलकांच्या माध्यमातून खर्च वसूल करण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे, मात्र हा मोक्याचा रस्ता पालिकेला देण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग उत्सुक नसल्याचे दिसते.

खड्डे बुजवण्याचे काम बेशिस्तपणे केल्याने वाहतूककोंडीची समस्या बिकट झाल्याने पोलिसांनी स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शनच्या मोहन परदेशी यांच्या विरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहतूक पोलीस मेटाकुटीला आले आहेत. अपुऱ्या मनुष्यबळात ते दिवस-रात्र पावसात काम करत आहेत. अनेक जण आजारी पडले आहेत. काम कुठे केले जाणार आहे, याची माहिती दिलीच जात नाही, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.

महामार्गाचा बहुतेक भाग नवी मुंबईतून जातो. गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. हा संपूर्ण रस्ताच पालिकेच्या ताब्यात देण्यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आले आहेत, पण त्याला प्रतिसाद मिळालेला नाही.

– जयवंत सुतार, महापौर, नवी मुंबई

वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून खड्डे बुजवले तर वाहतूककोंडी होणार नाही आणि दुरुस्तीचे कामही सुरळीत होईल, अशी व्यवस्था करता येऊ  शकते; मात्र वारंवार सांगूनही संबंधित कंत्राटदाराने दुर्लक्षच केल्यामुळे अखेर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

– बाळासाहेब तुपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा