मालमत्ता व आरोग्य विभागात अनेक वर्षे ठाण

नवी मुंबई : पाच वर्षांपेक्षा जास्त काळ पालिकेच्या मालमत्ता व आरोग्य विभागात ठाण मांडून बसलेल्या दोनशेपेक्षा जास्त कर्मचारी, अधिकाऱ्यांची बदली करण्यात येणार आहे. या विभागातील अनेक कर्मचारी व अधिकारी बदली झाली तरी ती रद्द करून त्या ठिकाणी राहता कसे येईल यासाठी प्रयत्न करीत असतात. याशिवाय पालिकेचा नगररचना विभागातील बांधकाम परवानगी कक्षात अनेकजण गेली काही वर्षे ठाण मांडून आहेत.

नवी मुंबई पालिकेच्या २२ विभागांच्या अनेक काहाण्या प्रसिद्ध आहेत. यातील नगररचना, अतिक्रमण, आरोग्य, शिक्षण व मालमत्ता कर विभागात काही अधिकारी कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांच्या मक्तेदारी कायम आहेत. त्यामुळे सर्व ‘ज्ञाती’ कर्मचारी या विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी लागतात, हे सर्वज्ञानी कर्मचारी म्हणजे वसुलीची ठिकाणे कोणती आणि ती कशी केली जाते हे माहीत असलेली म्हणून ओळखले जातात. अनेक विभागातील या कर्मचाऱ्यांच्या वेळोवेळी बदली झाल्या तरी त्या रद्द करून घेतल्या जात असतात. अतिक्रमण विभाग तर भ्रष्टाचारात निलंबित केलेल्या एका उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला आंदण देण्यात आला आहे. त्यामुळे या विभागातील कर्मचारी बैठय़ा घरांच्या पुनर्विकासात लाखो रुपये जमा करुन या विभागाला भोग चढवत असल्याची चर्चा कायम आहे.

सध्या पालिका क्षेत्रात सिडको मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आहे. पाचपेक्षा जास्त पुनर्विकास परवानगी देण्यात आलेल्या आहेत.

या परवानगी देण्यात आलेल्या नगररचना विभागात सध्या चांगभलं काळ सुरू आहे. नवी मुंबई पालिकेचा आरोग्य विभागातील राजकारण हे पराकोटीचे आहे. त्यामुळे या विभागात कधी महिला तर कधी पुरुष हा खेळ सुरू असल्याचे दिसून आले आहे. या विभागात पाच वर्षांपेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेले शेकडो कर्मचारी आहेत. त्याची यादी काढण्याचे काम सध्या सुरू आहे. अशा कर्मचाऱ्यांना आता दुसऱ्या विभागात बदली केली जाणार असून मालमत्ता विभागातील मक्तेदारीदेखील प्रशासनाच्या लक्षात आली आहे. पालिका क्षेत्रात पाच लाखांपेक्षा जास्त मालमत्ता आहेत पण पालिकेच्या दप्तरी केवळ ३ लाख २२ हजार मालमत्तांची नोंद आहे. मालमत्ता कराची नोटीस देण्याची धमकी देऊन कर खिशात घालण्याचे प्रकारही केले जात आहे.

कर नोटीस घोटाळा?

माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात हा मालमत्ता कर नोटीस घोटाळा उघडीस आला होता. उद्योजकांना मोठय़ा कराच्या नोटिसा देऊन नंतर कमी करात त्यांची तडजोड करण्याचा हा प्रकार गेली अनेक वर्षे सुरू आहे. त्यामुळे या करातून पालिकेला योग्य ते उत्पन्न मिळत नाही. या विभागातील अनेक वर्षे बदली न झालेले कर्मचारीही  हलविण्याचे काम केले जाणार असून ही संख्या शेकडो आहे.