सत्ताधारी भाजपलाच डोईजड; नागरिकांची समर्थनार्थ सह्य़ांची मोहीम

पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपला नकोसे झालेले कार्यक्षम आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची तत्काळ बदली करण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव आणला जात आहे. त्यामुळे १८ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या नवी मुंबई विमानतळ कामाच्या शुभारंभ प्रसंगी नाराजांचे विघ्न टाळता यावे यासाठी आयुक्तांची बदली होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. रायगड जिल्ह्य़ाच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आल्यानंतर ह्य़ा बदली प्रक्रियेला वेग आला आहे.

बेकायदेशीर बांधकामे, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, प्रशासकीय शिस्त, पारदर्शक कारभार, भ्रष्टाचारमुक्त पालिका यामुळे दीड वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पनवेल पालिकेचे आयुक्त डॉ. शिंदे यांनी वेगळा ठसा उमटविला आहे. सहा महिन्यापूर्वी झालेली पालिका निवडणूक पारदर्शक व्हावी यासाठी राज्य शासनाने त्यांची अडीच महिन्यासाठी उल्हासनगर पालिकेते बदली केली होती. निवडणुका संपल्यानंतर त्यांना पुन्हा पनवेल आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली, मात्र मागील काही महिन्यांपासून त्यांच्या बदलीचे सत्ताधारी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांनी तर शिंदे यांची बदली प्रतिष्ठेचा प्रश्न केला असून माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी कर्जतमधील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यात पुढील आठवडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई विमानतळ कामाच्या शुभारंभासाठी कोंबडभुजे येथे येत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या दृष्टीने विमानतळ हा महत्त्वाचा प्रकल्प असल्याने रायगड जिल्ह्य़ातील प्रमुख भाजप नेते असलेले ठाकूर कुटुंबाची नाराजी ओढवून घेण्यास भाजप सरकार तयार नाही. त्यामुळे या कार्यक्रमाअगोदर शिंदे यांची केवळ सहा महिन्यात बदली केली जाण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या बदलीविरोधात मोठय़ा प्रमाणात जनमत तयार होत असून रविवारपासून विविध भागात स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे.

सत्ताधारी भाजप नाराज का?

शिंदे यांच्या बदलीसाठी सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी देव पाण्यात ठेवण्याची तीन प्रमुख कारणे आहेत. नुकतीच करण्यात आलेली प्रभाग समित्यांची रचना सत्ताधारी पक्षाला विश्वासात न घेता करण्यात आली. पालिकेने निश्चित केलेला तुटपुंजा नगरसेवक निधी आणि निविदांमध्ये आणलेली पारदर्शकता यामुळे सत्ताधारी नाराज आहेत. याशिवाय रिपाइंच्या एका नगरसेवकाच्या पदावर टांगती तलवार लटकत असल्याने आरपीआय नेत्यांचाही शिंदे यांच्या उचलबांगडीसाठी आग्रह आहे.

संभाव्य बदलीविरोधात जनचळवळ

पनवेल शहराचे उज्ज्वल भवितव्य आणि विकास कामांसाठी डॉ. शिंदे यांची बदली करण्यात येऊ नये यासाठी पनवेल, खारघर या शहरी व ग्रामीण भागात रविवारपासून सह्य़ांची मोहीम राबवण्यास सुरुवात झाली असून यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय मोरे, नगरसेविका उज्ज्वला पाटील, सिटिझन युनिटी फोरमचे मंगेश रानवडे, यांचा समावेश आहे.