शिखांचे दहावे गुरू गुरू गोविंदसिंग यांच्या जन्मदिनानिमित्त १० जानेवारीला वाशी येथे होणाऱ्या सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. या दिवशी कोपरखैरणे ते वाशीदरम्यान मिरवणूक काढण्यात येणार आहे.
कोपरखरणे येथून सायंकाळी चार वाजता या मिरवणुकीची सुरुवात होणार आहे. ही मिरवणूक वाशी, सेक्टर ९ ए येथे समाप्त होणार आहे.
मिरवणुकीत ट्रक, कार आणि दुचाकींवरून शीख बांधव सामील होणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेऊन वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
कोपरखरणेहून वाशी मार्गे जाणाऱ्या वाहनांना ‘ब्लू डायमंड’ चौकातून डावीकडे वळण घेऊन पाम बीच मार्गे इच्छित स्थळी जावे लागणार आहे. या काळात वाशी-कोपरखरणे मार्गावरील काही वळणांवर वाहनांना प्रवेशबंदी असेल, असे वाहतूक विभागाने कळविले आहे.