खड्डय़ांमुळे वाहतुकीवर परिणाम; अपघात वाढले * ‘एमआयडीसी’  खड्डय़ात

नवी मुंबई नवी मुंबईसारख्या नियोजित शहरातील व आशिया खंडातील सर्वात मोठय़ा ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीत आले की, ‘खेडेगावातील रस्ता तरी बरा’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. पालिका व एमआयडीसी यांच्या वादात अगोदरच दुर्लक्षित असलेले येथील रस्त्यांची या पावसाने पुरती वाट लावली आहे. महापे, पावणे, तुर्भे या विभागांतील अंतर्गत रस्त्यांची पुरती चाळण झाली आहे.

सुमारे अडीच हजार कारखाने औद्योगिक पट्टय़ात आहेत. यातील महापे, पावणे, तुर्भे हा विभागही महत्त्वाचे औद्योगिक क्षेत्र आहे. मात्र या खड्डय़ांमुळे येथील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक अपघातही होत आहेत. रात्रीच्या वेळी तर जीव मुठीत घेऊनच वाहन चालवावे लागत आहे. अनेक भागांतील रस्त्यावर फक्त खडीचा भाग शिल्लक असून मोठे खड्डे पडले आहेत. दुचाकी वाहने या खडीवरून घसरत आहेत, तर चारचाकी वाहनांना मोठे ‘धक्के’ सहन करावे लागत आहेत.

या भागातील अनेक कारखान्यांसमोर तळी साचली आहेत. औद्योगिक वसाहतीत पालिकने अद्याप पावसाळी गटार योजना न राबविल्याने डोंगरातून येणारे सर्व पाणी औद्योगिक वसाहतीत जमा होत आहे. पावणे पुलाजवळच खड्डे पडलेले आहेत. तसेच महापे एमआयडीसीतील ‘मेको’ कंपनी ते ‘एलअ‍ॅन्डटी’ रस्त्याची चाळण झाली आहे. याअंतर्गत मार्गावर फक्त खड्डे, डांबरविरहित खडी शिल्लक आहे. वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याच मार्गावर पाण्याची पाइपलाइन टाकण्याचेही काम सुरू आहे. त्यामुळे अडचण वाढली आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावरून शिळफाटय़ाकडे जाताना उड्डाणपुलांच्या सुरुवातीला व संपताना मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. उड्डाणपुलाखालून असलेल्या प्रत्येक वळणावर खड्डे पडले आहेत. महापे पोलीस चौकीच्या पुढील बाजूलाच मोठे खड्डे आहेत. महापे सर्कल, इंदिरानगर, तुर्भे येथील मुख्य वळणावरील चौक, एलअ‍ॅन्डटी परिसरातील रस्ते, मिलेनियम बिझनेस पार्क प्रवेशद्वाराजवळील रस्ता, एसजीएस कंपनीसह विविध ठिकाणी अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत. शिळफाटामार्गे येणारा रस्ता ठाणे-बेलापूर रोडला ज्या ठिकाणी मिळतो, तेथेही मोठय़ा प्रमाणात पाणी साठत आहे. तसेच तेथील रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. एकंदरीतच औद्योगिक क्षेत्रातील महापे, तुर्भे, पावणे, खैरणे क्षेत्रांतील रस्त्यांची खड्डय़ांची दुर्दशा झाली आहे.

दरवर्षी पावसाळ्यात येथे बिकट परिस्थिती असते. गाडी चालवणे महाकठीण असते. सर्व रस्त्यांवरच पाणी साचल्यावर खड्डा कुठे व रस्ता कुठे हेच कळत नाही. त्यामुळे गाडीचे नुकसान होते. अपघाताचीही शक्यता असते. गाडीमध्ये माल भरलेला असतो. या भागांतील रस्ते नीट हवेत अशी मागणी वाहनचालक बलविंदर सिंग यांनी केली आहे.

आमचे प्रयत्न अपुरे पडतात..

महापे उड्डाणपूल, महापे सर्कल तसेच या शिळफाटय़ाकडे जाणाऱ्या या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होते. रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांबाबत एमआयडीसी अधिकाऱ्यांची सोमवारीच भेट घेतली तसेच महापालिकेलाही कळवले आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्थाच नसल्याने चर मारून पाणी काढावे लागते. परंतु हे तात्पुरते प्रयत्न आहेत. पालिका व एमआयडीसीने कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहिजे, असे महापेचे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी सांगितले.