पालिका आयुक्तांची एपीएमसी प्रशासनाला सूचना; मध्यरात्री अचानक पाहणी

नवी मुंबई</strong> : शहरात करोना रुग्णवाढ आटोक्यात आली असली तरी ‘एपीएमसी’तून संसर्गाची भीती कायम आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांनी गुरुवारी रात्री भाजी बाजारात अचानक भेट दिली. यात करोना नियमांचे आजही काटेकोर पालन होत नसल्याने त्यांनी शेतमाल वाहतूकदारांची करोना चाचणी नकारात्मक असल्यानंतरच त्यांना प्रवेश द्यावा आशा सूचना दिल्या आहेत. या संदर्भात एपीएमसी सचिवांशी बैठक घेण्यात येणार आहे.

वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती शहरातील वर्दळीचे ठिकाण आहे. गेल्या वर्षी हा परिसर करोना अतिसंक्रमित झाला होता. त्यामुळे दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यापासून पालिका आयुक्तांनी एपीएमसीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांनी यापूर्वीही अचानक भेटी देत करोना नियमांचे पालन होत नसल्याबाबत खंत व्यक्त करीत अनेक सूचना केल्या होत्या. याची अमलबजावणी होत आहे की नाही, याबाबत त्यांनी भाजीपाला बाजारात रात्री १२ नंतर अचानक भेट दिली. या वेळी या ठिकाणी मुखपट्टीचा वापर करण्यात टाळाटाळ करण्यात येत असून करोना चाचण्यांबाबतही दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

भाजीपाला मार्केटची वेळ बदलण्यात आली असून रात्री दहा वाजल्यापासून  येथील व्यवहार सुरू होत आहेत. या बाजारात राज्यभरातून ट्रकमधून भाजीपाला येत असतो. बाजार आवारात पालिकेच्या वतीने तीन पाळींमध्ये करोना चाचणी केंद्र सुरू केले आहे. मात्र तरीदेखील चाचणी करून घेण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

या बाजारात सुमारे ८ ते १० हजार नागरिकांची वर्दळ असते मात्र चाचणीचे प्रमाण हे दिवसाला दोनशेच्या घरात आहे. त्यामुळे बाजार घटकांच्या जास्तीत जास्त चाचण्या करण्यात याव्या अशा सूचना त्यांनी या वेळी एपीएमसी प्रशासनाला दिल्या. शेतमाल उतरविताना अनेकांच्या नाकाखाली अथवा गळ्यात मुखपट्टी लटकवलेली होती.

यामुळे आयुक्तांनी तेथील सुरक्षारक्षक व प्रमुखांना एकही ट्रक चालक व वाहकाची करोना चाचणी नकारात्मक असल्याचा अहवाल दाखविल्याशिवाय आत जाता कामा नये. ज्यांच्याकडे अहवाल नाही त्यांची करोना चाचणी केल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जावा अशा सूचना दिल्या.

परराज्यातून संसर्गाचा धोका

आंध्र प्रदेश, तमिळनाडू, राजस्थान अशा विविध राज्यांतूनही भाजीपाला घेऊन या ठिकाणी ट्रक येत असतात. त्यामुळे इतर राज्यांतून करोना संसर्ग शहरात पसरू नये याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून याबाबत एपीएमसी प्रशासनाशी लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.

भाजीपाला बाजारात अचानक पाहणी केल्यानंतर मुखपट्टीचा वापर व्यवस्थित न करणे, करोना चाचणी न करणे अशा काही बाबी निदर्शनास आल्या आहेत. बाजार समिती प्रशासनाला या बाबींकडे लक्ष देण्याच्या लेखी सूचना देण्यात येतील. लवकरच बैठक घेतली जाईल.

अभिजीत बांगर, आयुक्त, महानगरपालिका