बेलापूर ते तळोजा मार्गावर वर्षअखेरीस प्रवास शक्य

पनवेल : नवी मुंबई मेट्रो मार्गिका १ ची शुक्रवारी दुसरी चाचणी करण्यात आली असून ती यशस्वी झाल्याचा दावा सिडकोने केला आहे. यामुळे स्थानक क्रमांक सात ते अकरा दरम्यानचा प्रवास नवी मुंबईकर या वर्षअखेरीस करू शकतील अशी शक्यताही सिडकोने वर्तवली आहे. यामुळे बेलापूर ते तळोजा मार्गे खारघर या मार्गावरील मेट्रो प्रवासाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

यापूर्वी २१ महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पहिली चाचणी करण्यात आली होती. अनेक वर्षांपासून नवी मुंबईकर मेट्रो प्रवासाच्या प्रतीक्षेत आहेत. शुक्रवारी करोनाकाळात संपूर्ण यंत्रणा गुंतलेली असताना सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीमध्ये मेट्रोची दुसरी चाचणी घेण्यात आली. आगार प्रवेश छन्नमार्गावर आणि तळोजा आगारातील चाचणी मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात आली. एकूण ८५० मीटर लांबीच्या मार्गावर मेट्रो शुक्रवारी धावली. सुरक्षिततेच्या कारणास्तव ताशी ६५ किलोमीटरचा वेग यावेळी राखण्यात आला.  नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण ४ उन्नत मार्ग (एलिव्हेटेड कॉरिडॉर) विकसित करण्यात येत आहेत. तळोजा

आगार येथील आगार प्रवेश छन्नमार्गावर (अ‍ॅप्रोच व्हायडक्ट) मेट्रोची यशस्वी चाचणी करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार ही चाचणी घेण्यात आली. मेट्रो प्रकल्पाच्या बेलापूर ते पेंधर या मार्ग क्रमांक १ च्या जलद अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र मेट्रो रेल कॉपरेरेशनची (महा मेट्रो) नियुक्ती करण्यात आली असून महा मेट्रोकडून २३ फेब्रुवारीला प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता २० तज्ज्ञ अभियंत्यांच्या गटाची स्थापना करण्यात आल्याचे सिडकोने सांगितले आहे.

मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएआरएस) यांचे सुरक्षाविषयक प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर मार्ग क्रमांक १वरील स्थानक ७ ते ११ दरम्यान साधारणत: डिसेंबर २०२१ अखेरीस आणि स्थानक १ ते ७ दरम्यान साधारणत: डिसेंबर २०२२ अखेरीस  प्रवासी वाहतुकीस सुरुवात होणार असल्याचे सिडकोने शुक्रवारी जाहीर केले आहे.

नवी मुंबईकरांना सर्वोत्तम पायाभूत सुविधा पुरवून त्यांचे जीवनमान उंचावण्यास सिडकोने नेहमीच प्राधान्य दिले आहे. म्हणून नवी मुंबई मेट्रो प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होऊन नवी मुंबईकरांच्या सेवेत रुजू व्हावा याकरिता सिडको प्रयत्नशील आहे. मार्ग क्रमांक १ वर मेट्रोची चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे या मार्गावर लवकरच मेट्रो धावू लागेल.

-डॉ. संजय मुखर्जी,

व्यवस्थापकीय संचालक, सिडको