नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसगाडय़ा वेळेआधीच सोडण्याचा प्रकार; खारघरमधील नागरिकांकडून शेवटच्या गाडीची वेळ वाढविण्याची मागणी

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही पूर्णपणे प्रवाशांच्या हितासाठी आखण्यात आली असली, तरी नवी मुंबई परिवहन सेवेला तिचा विसर पडलेला दिसत आहे. सिडकोची वाढती घरसंकुले आणि तळोजा औद्योगिक वसाहतीपर्यंत फोफावत चाललेल्या वस्तीसाठी खारघर रेल्वे स्थानकाहून निघणाऱ्या गाडय़ांचे चालक आपल्या मर्जीपणे या गाडय़ा हाकत असून रात्रीच्या गाडय़ा वेळेआधी नेण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून विनाकारण आर्थिक आणि मानसिक भरुदड सहन करावा लागत आहे.

खारघर रेल्वे स्थानकामधून तळोजा औद्योगिक वसाहतीपर्यंतच्या पट्टय़ातील ३८ सेक्टर्सपर्यंत गेल्या काही वर्षांत शेकडो घरसंकुले उभारली असून सिडकोने या क्षेत्रांत हजारो परवडणाऱ्या घरांची निर्मिती केली आहे. मात्र येथील वाढत्या लोकसंख्येला घरी परतण्यासाठी मुंबईतील इतर शहरांच्या तुलनेत रेल्वेशी संलग्न असलेली पुरेशी सार्वजनिक वाहतूक यंत्रणाच उपलब्ध नाही.

दररोज रात्री पावणेदोन वाजता मुंबईकडून खारघर रेल्वे स्थानकातून शेवटची गाडी पनवेलकडे रवाना होते. पण येथून तळोजापर्यंत जाणाऱ्या सर्व वसाहतींकडे जाण्यासाठी नवी मुंबई परिवहन सेवेची शेवटची बस मात्र रात्री १२.५५ वाजता सुटते. त्यामुळे ही वेळ चुकल्यास शेकडो प्रवाशांना घरी पोहोचण्यासाठी रिक्षा किंवा मिळेल त्या वाहनाचा वापर करावा लागतो. यात किमान पन्नास ते दोनशे रुपये असा खर्च येत असल्यामुळे परिवहन सेवेच्या शेवटच्या गाडीची वेळ वाढविण्यात यावी अशी मागणी वेळोवेळी हा भर्ु्दड सोसावा लागणाऱ्या नागरिकांकडून होत आहे.

मंगळवारी रात्री (बुधवारी पहाटे) अशाच प्रकारे या गाडीच्या चालक-वाहकाने दोन रेल्वे गाडय़ातील प्रवाशांची वाट न पाहता  दहा ते पंधरा मिनिटे अगोदरच निघून गेल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. ठाणे आणि मुंबईकडून येणाऱ्या रेल्वेगाडय़ांतील शेकडो प्रवासी बस थांब्यावर गाडीची वाट पाहात उभे होते. मात्र बस फार आधीच निघून गेली असल्याचे आसूडगाव डेपो येथे दूरध्वनी केल्यानंतर लक्षात आले. या गाडय़ा खारघरमधील रहिवाशांसाठी आहेत की वाटेल तशा हौसेने गाडी चालविणाऱ्या चालकांसाठी, असा प्रश्न मानखुर्द येथील व्यावसायिक आणि खारघरच्या स्वप्नपूर्ती संकुलात राहणारे एन. शेट्टी यांनी उपस्थित केला.

वयाची साठी उलटलेले शेट्टी दररोज १२.४० किंवा १ वाजता येणाऱ्या रेल्वेतून खारघर येथे उतरतात. सार्वजनिक परिवहन सेवेचा ते दररोज वापर करतात. मात्र या बसचालकांच्या लहरीपणामुळे शेवटची बस मिळेल की नाही, याबाबत त्यांना कधीच खात्री नसते. ‘अनेकदा वेळेत येऊनही धावत गाडी पकडावी लागते. चालक आणि वाहकांनी रेल्वे आलेली आहे, हे पाहिलेले असूनही केवळ आपल्या मनाने नियमांवर बोट ठेवत गाडी पुढे नेली आहे,’ असे या मार्गावरील ओवेगाव परिसरात राहणारे आणि मुंबईत हॉटेलिंग व्यवसाय करणारे श्रीयुत सिंग यांनी सांगितले.

‘या बसच्या आधी १२.४०ची एक बस तळोजा मार्गावर जाते. ती गाडी सुटल्यानंतर अगदी दोन किंवा तीन प्रवाशांना घेऊनही गाडी १२.५० वाजता सोडली जाते. निर्धारित वेळ १२.५५ची असताना कित्येकदा फार आधीच सोडली जाते. या गाडीची वेळ किमान १ वाजून पाच मिनिटे केल्यास आणखी एका रेल्वेगाडीतून उतरणाऱ्या प्रवाशांना सार्वजनिक बससेवेचा वापर करता येईल, हा उपाय चेंबूरमधील आपले घडय़ाळाचे दुकान बंद करून खारघरमध्ये १२.५५ची गाडी दररोज पकडण्यासाठी आटापिटा करणाऱ्या अरुण श्रीवास्तव यांनी सांगितले.

होतेय काय?

या गाडय़ा त्यांच्या निर्धारित वेळेत सुटत असत्या तर प्रवाशांकडून तक्रार नव्हती. पण १२.५५च्या दरम्यान ठाणे-पनवेल आणि मुंबईहून पनवेलकडे येणाऱ्या प्रवाशांना अनेकदा स्वयंमग्न चालक-वाहकांच्या गाडी वेळेआधी नेण्याच्या प्रकारामुळे या बसगाडय़ा पकडता येत नाही. १२.५५ ची गाडी १२.५० किंवा त्याहीआधी केवळ दोन-तीन प्रवाशांना घेऊन नेण्याचे प्रकार या मार्गावर अनेकदा घडत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत विनंती करण्यात आल्यानंतर चालक-वाहकांना गाडी १ वाजेर्प्यत थांबवून ठेवण्याच्या सूचना वरिष्ठांनी केल्या असल्या, तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत गाडय़ा वेळेआधी नेल्या जात आहेत.

गाण्यांची आवड प्रवाशांच्या माथी..

अनेकदा या मार्गावर रात्रीच्या शेवटच्या फेरीसाठी  तेजस्विनी बसेस वापरली जाते. या बसमध्ये स्पीकर्सची व्यवस्था असल्याने वाहन चालक आपल्या मोबाइलमधील चित्रपट संगीत त्यावर कर्णकर्कश आवाजामध्ये लावून प्रवाशांच्या कर्णी नवा त्रास तयार करतात. रात्री कामावरून थकून परतलेल्यांना गाडी पकडल्यानंतर या नव्या संगीत उपद्रवाला सामोरे जावे लागते.

वाहक आणि चालक यांना दररोज निर्धारित वेळेहून पाच ते दहा मिनिटे अधिक थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र रामदास खादे आणि वारे या वाहन-चालकाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत प्रवाशांना न नेता दहा मिनिटे आधी गाडी खारघरमधून नेली. त्याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. – भरत पाटील, नियंत्रक, आसूडगाव डेपो

प्रवाशांच्या या समस्येची दखल घेण्यात येत असून येत्या दोन ते तीन दिवसांत त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. – शिरीष आरदवाड , व्यवस्थापक एनएनएमटी