पालिकेच्या रुग्णालयात गाद्या अंथरून रुग्णांवर उपचार; नागरी आरोग्य केंद्रांतही रुग्णांच्या संख्येत वाढ

दोन आठवडय़ांपासून पडणारे कडक ऊन आणि दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस अशा वातावरणातील तीव्र बदलामुळे नवी मुंबईत विविध आजारांची साथ पसरली आहे. विषाणुसंसर्गाचे प्रमाण वाढल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या तसेच खासगी रुग्णालयांत दाखल होणाऱ्या साथीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सुमारे ३०० खाटांची क्षमता असलेल्या वाशी पालिका रुग्णालयात तर खाटा रुग्णांनी व्यापल्याने जमिनीवर गाद्या अंथरून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तर नागरी आरोग्य केंद्रांतही रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

जुलैच्या सुरुवातीला दहा दिवस झालेल्या दमदार पावसानंतर गेले दोन आठवडे पावसाने दडी मारली होती. यादरम्यान तापमानाचा पाराही ३५ अंशांवर गेला होता. त्यातच आता मंगळवारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. वातावरणातील या तीव्र चढ-उतारामुळे नवी मुंबईसह आसपासच्या शहरांत विषाणुजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. अशा प्रकारचे तापमान विषाणुसंसर्गासाठी पोषक ठरत असल्याने नवी मुंबईत सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढत आहेत. यापैकी बहुतांश रुग्ण खासगी दवाखाने वा रुग्णालयांत जाऊन उपचार घेत असले तरी, वाढत्या रुग्णसंख्येचा ताण पालिकेची रुग्णालये आणि नागरी आरोग्य केंद्रांवरही येऊ लागला आहे.

वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात उपचारासाठी दररोज २२०० रुग्ण येत असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दयानंद कटके यांनी दिली. वाशी रुग्णालयात ३०० खाटा आहेत. मात्र, सध्या या सर्व खाटा रुग्णांनी व्यापल्या असून तरीही आणखी रुग्ण दाखल होत असल्यामुळे सध्या येथे जमिनीवर गाद्या अंथरून रुग्णांना उपचार दिले जात असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. पालिकेच्या २३ नागरी आरोग्य केंद्रांमध्येही रुग्णांचा ओढा वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आरोग्यसेवा अपुरीच

नवी मुंबईत ५० खाटांचे नेरुळ येथील स्व. मीनाताई ठाकरे माता-बाल रुग्णालयाच्या जागेवर सात मजली सार्वजनिक रुग्णालय उभारले, तर बेलापूर येथेही ७६ खाटांचे माता-बाल रुग्णालय बांधले आहे. तर ऐरोली येथील पालिकेच्या रुग्णालयात फक्त माता-बाल रुग्णालयसेवा सुरु आहे. त्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयांच्या इमारतींना लाजवेल अशा इमारती उभारल्या पण आजही या सर्वच रुग्णालयांमध्ये आरोग्यसेवेचा तुटवडा आहे.

शहरात संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे. परंतु नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ ताप, खोकला, सर्दी झाल्यास डॉक्टरांना दाखवावे. वातावरणातील बदलामुळे रुग्णांची संख्या जास्त झाली आहे. पालिका योग्य ती खबरदारी घेत आहे.

– डॉ. दयानंद कटके, वैद्यकीय अधिकारी, नवी मुंबई महापालिका

७५००

रुग्णांची एकूण  संख्या :

१५००

सर्दी व खोकल्याचे रुग्ण

२१०५

तापाचे रुग्ण

३८९६

इतर रुग्ण