पदपथ, रस्त्यांवर फांद्या; अपघाताची शक्यता

पावसाळ्याला सुरुवात झाली तरीही पावसाळापूर्व कामांपैकी एक असलेले झाडांच्या छाटणीचे काम अद्याप करण्यात आलेले नाही. सिडको वसाहतीत अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या अस्ताव्यस्त वाढल्या आहेत. सोसाटय़ाच्या वाऱ्यात या फांद्या मोडून पादचाऱ्यांना दुखापत होण्याची आणि वाहनांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. झाड कोसळल्यास जिवावरही बेतू शकते, मात्र आपत्कालीन यंत्रणा अद्याप सुस्त आहे.

खारघर रेल्वे स्थानकाबाहेरील सेक्टर १मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडे आहेत. नाला आणि पदपथाला लागूनच असलेली ही झाडे अस्ताव्यस्त वाढली आहेत. या फांद्या डोक्याला लागू नयेत म्हणून पादचाऱ्यांना वाकून चालतात.

काही दिवसांपूर्वी कळंबोली शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यामुळे मोठे वृक्ष कोसळले होते. येथील बहुतेक वृक्षांच्या मुळाशी मातीच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे थोडय़ाशा वाऱ्यानेही ही झाडे कोसळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास जीवितहानी होऊ शकते. कळंबोलीमध्ये नुकतेच एका चारचाकी वाहनावर झाड पडले. तरीही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे.