विविध स्पर्धात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

नेरूळ येथील वंडर्सपार्कमध्ये नवी मुंबई महापालिकेने आयोजित केलेल्या तीन दिवसीय झाडे, फुले, फळे, भाजीपाला प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद लाभला. विविध प्रकारची फुले, फळे, भाज्या, शोभिवंत झाडे एकाच छताखाली पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनातून नवी मुंबई आणि परिसरातील रहिवाशांना मिळाली. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी २० हजारांहून अधिक तर शनिवार-रविवार या सुट्टीच्या दिवसांत लाखाहून अधिक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. नवी मुंबईतील ३० हून अधिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहिले.

विविध २४ विभागांमध्ये वृक्ष, फुले, फळे, भाजीपाला यांच्या वैशिष्टय़पूर्ण रचना करण्यात आल्या होत्या. प्रत्येक ठिकाणी वनस्पतीचे प्रचलित नाव तसेच शास्त्रीय नाव लिहिण्यात आले होते. त्यांची संक्षिप्त माहितीही देण्यात आली होती. त्यामुळे निसर्गप्रेमी आणि विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन ज्ञानात भर घालणारे ठरले.

विद्यार्थ्यांसाठी पाने, फळे, फुले, भाजीपाला ओळखण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. नोंदविला होता. प्रदर्शनात औषधे, खते यांचेही स्टॉल्स उपलब्ध होते. प्रत्येक दालनात पूरक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. शून्य कचरा संकल्पनेचे महत्त्व पटवून देणारे स्टॉलही उपलब्ध होते. नागरिकांनी घरातच ओल्या कचऱ्यापासून खत टोपलीद्वारे खत कसे तयार करावे, बाल्कनीत, गच्चीत, आवारात बाग कशी फुलवावी याचे मार्गदर्शन करण्यात आले.