७० हजार खड्डे खोदण्याचे काम प्रगतिपथावर

सामाजिक वनीकरणाअंतर्गत गेल्या वर्षी पारसिक डोंगराच्या रांगेत ३५ हजार फळझाडे लावणाऱ्या नवी मुंबई पालिकेने यंदा एक लाख झाडे लावण्याचा संकल्प सोडला असून मोरबे धरणाजवळ यातील जास्तीत जास्त झाडे सामाजिक वनीकरणाअंर्तगत लावली जाणार आहेत. या वृक्षारोपणासाठी आत्तापासून खड्डे खोदण्याचे काम सुरू करण्यात आले असून ७० हजार खड्डे खोदण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

मुंबई, ठाण्यापेक्षा नवी मुंबईत तापमान जास्त असल्याचे आढळून आले आहे. शहर वसविताना मोठय़ा प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे हे तापमान वाढल्याचा एक निष्कर्ष आहे. मुंबईला पर्यायी शहर वसविताना या भागात मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. २९२ दगडखाणी सुरू करताना अशाच प्रकारे वृक्षतोड झाली होती. सध्या नवी मुंबई विमानतळ परिसरात वृक्षतोड सुरू असून हजारो झाडांची कत्तल झालेली आहे.

सिमेंटचे जंगल झालेल्या नवी मुंबईत केवळ साडेआठ लाख झाडे असून यात सुबाभूळसारखी ठिसूळ झाडांचे प्रमाण जास्त आहे. राज्य सरकारच्या कोटय़वधी झाडांच्या वृक्षारोपण मोहिमेत गेल्या वर्षी नवी मुंबई पालिकेने पन्नास हजार झाडांचे रोपण केले आहे.

दिघा येथील पारसिक डोंगराच्या रांगेत पालिकेने ३५ हजार झाडे लावली आहेत. यात यावेळी फळझाडे मोठय़ा प्रमाणात लावण्यात आलेली आहेत. शिल्लक १५ हजार झाडे ही शहरातील विविध मोकळ्या ठिकाणी लावण्यात आली आहेत. त्यापूर्वी पारसिक टेकडीवर (महापौर बंगल्याजवळ) पालिकेने ११ हजार झाडांचे रोपण केले आहे. शहराला वृक्षारोपणाची नितांत गरज असल्याने यंदा पालिकेने एक लाख झाडे लावण्याचा संकल्प सोडला आहे. यातील जास्तीत जास्त झाडे ही मोरबे धरण परिसरात लावली जाणार आहेत.

सर्वसाधारणपणे पहिल्या पावसाचा शिडकावा झाल्यानंतर वृक्षारोपण केले जाते. त्यासाठी लागणारे खड्डे मात्र आत्तापासून खोदण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मोरबे धरण परिसरात सामाजिक वनीकरणाअंतर्गत वृक्षारोपण केले जाणार असून पारसिक डोंगर व पारसिक टेकडीवर मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण केले जाणार आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबई पालिकेने हिरिरीने भाग घेतला आणि अव्वल स्थान प्राप्त केले आहे. त्याच धर्तीवर आता वृक्षारोपण ही नवी मुंबई पालिका एक स्वतंत्र मोहीम सुरू करणार असून जास्तीत जास्त झाडे यंदा लावली जाणार आहेत. एक लाख वृक्षारोपणाच्या या संकल्पात मोरबे धरण क्षेत्रात सामाजिक वनीकरण केले जाणार आहे.    – डॉ. रामास्वामी, एन.आयुक्त, नवी मुंबई पालिका