15 December 2017

News Flash

कुटुंबसंकुल : भंगार विकून वृक्षलागवड

केवळ वृक्षारोपणच नव्हे, तर अन्यही अनेक प्रकारे येथे निसर्गाची काळजी घेतली जाते. 

पूनम धनावडे | Updated: August 8, 2017 3:36 AM

सिद्धिविनायक रेसिडेंसी, कामोठे, से. ९

सिद्धिविनायक रेसिडेंसी, कामोठे, से. ९

निसर्गाचे रक्षण ही सर्वाचीच जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी अनेक संकुले विविध उपक्रम राबवतात; मात्र कामोठे येथील सिद्धिविनायक रेसिडेंसीमध्ये राबवण्यात आलेला उपक्रम अनोखा आहे. येथील रहिवासी दर तीन महिन्यांनी सोसायटीतील भंगार आणि रद्दी विकतात आणि त्यातून विविध झाडांची रोपे, खत खरेदी करतात..

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, हिरवळ टिकवून ठेवण्यासाठी विविध सोसायटय़ा वृक्ष लागवड करतात, परंतु कामोठे येथील सिद्धिविनायक संकुल वेगळी संकल्पना राबवत आहे. रद्दी, भंगार एकत्रित करून विकून वृक्ष विकत घेऊन त्यांचे संवर्धन केले जाते.

नियोजनबद्ध काम केले तर कमी जागेत खूप काही करता येते, याचा प्रत्येय कामोठे सेक्टर ९ येथे असलेल्या सिद्धिविनायक रेसिडेंसीत येतो. निसर्गाशी कसे जुळवून घेता येते, याचे उत्तम उदाहरण येथे पाहायला मिळते. संकुलातील सर्व रहिवासी तीन महिन्यांतून एकदा जवळ जवळ ५०० किलो रद्दी एकत्र करून ती विकतात आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांमधून वृक्ष लागवड करतात. वृक्षारोपण म्हणे केवळ शोभा वाढवणारी झाडे नव्हे. त्यांनी तिथे विविध भाज्यांची लागवड केली आहे. त्यांच्यासाठी लागणारे खत विकत घेण्यात येते. भाज्यांमध्ये कारली, कोथिंबीर, मिरची, फळांमध्ये पपई, सीताफळ इत्यादी झाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे रहिवाशांचा भाजीचा बराच खर्च वाचतो.

केवळ वृक्षारोपणच नव्हे, तर अन्यही अनेक प्रकारे येथे निसर्गाची काळजी घेतली जाते.   गणेशोत्सवात पीओपीच्या उंचच उंच मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात असताना ‘सिद्धिविनायक’ मध्ये मात्र अशा मूर्तीऐवजी सुपारीची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव साजरा केला जातो.

सात दिवस सुपारीची पूजा करून संकुलातच विसर्जन केले जाते. तसेच या उत्सवादरम्यान सामाजिक भोजन समारंभामध्ये प्लास्टिकच्या ताट-वाटय़ा न वापरता प्रत्येक रहिवासी आपआपल्या घरातून जेवणाची ताटे घेऊन येतात. प्लास्टिक, थर्माकोलने पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कमी करण्यात छोटासा मदतीचा हात पुढे करत असल्याची भावना येथील नागरिक व्यक्त करतात.

केवळ गणेशोत्सवच नव्हे, तर अन्यही सर्व सण-उत्सव एकत्रितपणे साजरे करताना येथील रहिवासी पर्यावरणरक्षणाचा वसा जपतात. नियमितपणे संकुलाची डागडुजी आणि स्वच्छता राखली जाते.

अधिक भाज्यांच्या लागवडीच्या प्रयत्नात

संकुलाने भाज्या लागवडीचा उपक्रम सुरू केला असला, तरीही अद्याप मोठय़ा प्रमाणात लागवड करण्यात आलेली नाही. भविष्यात विविध प्रकारची झाडे लावून त्यांचा नित्याच्या जीवनात उपयोग व्हावा, असा मानस असल्याची प्रतिक्रिया येथील रहिवासी व्यक्त करत आहेत. तसेच सोसायटीमध्ये सौर दिवे बसवून विजेची बचत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त पर्यावरण पूरक पाऊले उचलण्यात येणार आहेत.

First Published on August 8, 2017 3:36 am

Web Title: tree plantation in siddhivinayak residency kamothe sector 9