दुष्काळ, जंगल सपाटीकरणामुळे आदिवासींवरील आर्थिक संकट गहिरे
मानवाच्या सर्वागीण विकासासाठी अन्यायाच्या विरोधात रान पेटविण्याचा अंगार हृदयात फुलवणाऱ्या कवीच्या कल्पनेतील या ओळी आजच्या ‘विकास सम्राटां’नी शब्दश: खऱ्या करून दाखविण्याचा चंगच बांधला आहे. दिसेल ते रान पेटवून, जंगलतोड करून तेथे सिमेंटची लागवड करण्याचा सपाटा सुरू आहे. त्याचा थेट परिणाम आदिवासींच्या उपजीविकेवर झाला आहे.
करवंदे जांभळे, काजू, फणस आणि आंबे यासारखा रानमेवा नष्ट होत चालला आहे. तसेच पावसाळ्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या रानभाज्यांची विक्री करून पारंपरिक व्यवसायावर आपली उपजीविका भागवीत होते; मात्र दुष्काळ आणि जंगल सपाटीकरणामुळे आदिवासींवर आर्थिक संकट कोसळले आहे. यात उरण व अलिबाग तालुक्यातील जंगल परिसरातील शेकडो एकर जमिनी खासगी मालकांनी खरेदी केल्या आहेत व केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी विकासाच्या नावावर मातीच्या भरावासाठी डोंगर व जंगलाचे सपाटीकरण वेगाने सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील रानमेव्यांची ठिकाणे असलेली जंगले व परिसर नष्ट होऊ लागली आहेत.जंगलचा राजा म्हणून आदिवासींचा उल्लेख केला जातो. जंगलातील उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीवर गेल्या हजारो वर्षांपासून त्याची व त्याच्या कुटुंबाची गुजराण होत आली आहे. मात्र सध्या आदिवासींचे स्थान असलेल्या जंगल परिसरावर शहरातील बडय़ांची नजर वळली आहे. येथील जागा मोठय़ा प्रमाणात खरेदी केल्या जात असून मागील अनेक वर्षे या जागा मोकळ्या असल्याने या जागांवर असलेल्या झाडांवर येणाऱ्या रानमेव्यांची विक्री करून आदिवासी आपल्या कुटुंबांच्या गरजा भागवत होता. यामध्ये सध्या वेगाने अनेक ठिकाणच्या डोंगरांचे सपाटीकरण करून येथील माती काढली जात आहे. त्यासाठी जंगल नष्ट करून जंगलातील शेकडो वर्षांची झाडेही तोडली जात आहेत. यात जंगलात येणाऱ्या करवंदाच्या जाळ्याही नष्ट झाल्याने या वर्षी बाजारातील करवंदांची आवक घटली आहे.

खासगी कुंपण
आंबे, काजू व जांभळांसारख्या रानमेव्यांची झाडे खासगी मालकांच्या कुंपणात बंदिस्त झाल्याने त्याचेही प्रमाण कमी झाल्याचे मत द्रोणागिरी येथून उरणमध्ये येऊन रानमेव्याची विक्री करणाऱ्या ७० वर्षीय किसनी नाईक या आदिवासी महिलेने व्यक्त केले आहे.
उरण तालुक्यातील अनेक ठिकाणची करवंदाची जाळीच नष्ट झाल्याने मुलांना करवंदे मिळत नसल्याची माहिती कोप्रोली आदिवासी वाडीवरील बेबी कातकरी यांनी दिली. त्याप्रमाणे द्रोणागिरीसारख्या डोंगरातील रानमेव्यांचेही प्रमाण आता कमी झाल्याने आता दुसरे कोणतेच उत्पन्नाचे साधन उरले नाही, असे शिवा वाघमारे म्हणाला. त्याचबरोबर अनेकदा जंगलात वणवे लागत असल्याने रानमेवे जळून जात आहेत.