तुकाराम मुंढे नवी मुंबई महापालिका आयुक्त

nmv01मुंबईला पर्याय म्हणून अतिशय विचारपूर्वक आणि नियोजनाचा ठोस आराखडा तयार करून नवी मुंबईची निर्मिती करण्यात आली असली तरी आज इतक्या वर्षांनंतर या शहराच्या काही जमेच्या आणि उणिवांच्या अशा काही बाजू तयार झाल्या आहेत. जगातील काही महत्त्वांच्या शहरांमध्ये मुंबईची गणना होत असली तरी तेथे भेडसावणाऱ्या पायाभूत समस्यांचे प्रश्न नवी मुंबईत नसावेत, अशी येथील रहिवाशांची माफक अपेक्षा असते. मुंबईची गर्दी, वाहतूक कोंडी, वाहनतळाच्या समस्या, मोकळ्या जागांचे प्रश्न नवी मुंबईत निर्माण होऊ नयेत अशा पद्धतीचे ठोस नियोजन इतक्या वर्षांत सिडकोने केले आहे. मात्र वेळ जसा पुढे सरकतो आहे तसे या शहरापुढील पायाभूत नियोजनाच्या समस्याही वाढीस लागण्याची भीती आहे. नवी मुंबईलगतच आंतरराष्ट्रीय विमानतळासारखा मोठा प्रकल्प उभा राहणार आहे. याच भागात सिडकोकडून नव्या नगराची निर्मिती होणार आहे. नव्याने उभ्या राहणाऱ्या या व्यवस्थांचा भार आपसूकच ऐरोली-वाशी-बेलापूर या उपनगरांच्या त्रिकोणात वसलेल्या शहरावर पडणार आहे. त्यामुळे पुढील काही वर्षे नवी मुंबईत वाहतूक, वाहनतळ, रस्ते, मोकळ्या जागांचे नियोजन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्थार्जन, उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी अधिक पोषक व्यवस्था उभी राहावी यासाठी ठोस आखणी करावी लागणार आहे.

[jwplayer zZz7idXw-1o30kmL6]

मुंबई महानगर क्षेत्रात नवी मुंबईचे एक वेगळे महत्त्व नेहमीच दिसून आले आहे.  देशाच्या आर्थिक राजधानीचे एक उपकेंद्र म्हणून या शहराच्या परिघाचा झपाटय़ाने विस्तार होऊ लागला आहे. विमानतळाच्या सोबतीला या भागात औद्योगिक विकासाचे नवे केंद्रही विकसित होत जाणार आहे. त्यामुळे गेल्या ४० वर्षांत विकासाचा एक टप्पा पूर्ण करणारे हे शहर नव्या पर्वात प्रवेश करू पाहात आहे. अर्थातच, या टप्प्यात नव्याने होणाऱ्या नागरीकरणाचा वेग स्थिरावणार असला तरी पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मात्र आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागणार आहे.  हे नियोजन नेमके कसे असावे यासाठी नवी मुंबई महापालिकेमार्फत केली जाणारी प्रकल्पांची मांडणी सरकारला पोषक ठरणार आहे.

मेट्रो, जलवाहतूक प्रकल्पांना प्राधान्य

विमानतळासारखा मोठा प्रकल्प हाती घेत असताना राज्य सरकारने दळणवळणाच्या दृष्टीने काही मोठय़ा प्रकल्पांची आखणी सुरू केली असली तरी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात वाहतूक व्यवस्थेच्या काही नव्या पर्यायांवर आतापासूनच विचार करण्याची गरज आहे. सिडकोने काळाची पावले ओळखत बेलापूर ते विमानतळ मार्गावर मेट्रो मार्गाच्या विविध टप्प्यांची आखणी केली असून त्यापैकी काही मार्गावर प्रत्यक्ष कामही सुरू झाले आहे. केवळ नव्या उपनगरांपुरता हा प्रकल्प मर्यादित ठेवण्याऐवजी त्याची व्याप्ती सायन-पनवेल महामार्गावरून ठाणे-बेलापूर मार्गाने ठाण्यापर्यंत वाढवावी, अशा स्वरूपाचा प्रस्ताव मी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या पायाभूत सुविधा बैठकीपुढे मांडला आहे. यामुळे नवी मुंबईतील अंतर्गत वाहतुकीचा मोठा भार हलका होऊ शकेल, तसेच भविष्यात उभ्या राहणाऱ्या मोठय़ा प्रकल्पांना साहाय्यभूत ठरेल. एकीकडे मेट्रो मार्गाचा विस्तार करताना शासनाने जलवाहतुकीच्या काही पर्यायांचा विचार सुरू केला आहे हे नवी मुंबईसाठी ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. नेरुळ, वाशी, बेलापूर अशा केंद्रांवरून मुंबईपर्यंत थेट जलवाहतुकीच्या प्रकल्पांना वेग मिळत असून कांजूरमार्ग ते कोपरखैरणे खाडीपुलाची उभारणीही महत्त्वाची ठरणार आहे. सरकारच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना नवी मुंबई महापालिकेने पाम बिच मार्गाच्या विस्तार करून बळ देण्याचे ठरविले आहे. घणसोली ते ऐरोली या दीड किलोमीटर अंतराच्या खारफुटीच्या पट्टय़ामुळे पाम बिच मार्गाचा थेट ऐरोलीपर्यंत होणारा विस्तार रखडला आहे. पर्यावरण विभागाची मंजुरी आणि उर्वरित कामांचे नियोजन महापालिकेने हाती घेतले असून हा प्रकल्प उतरल्यास ठाणे-पुणे मार्गाला नाशिक-ठाणे-नवी मुंबई अशी समांतर मार्गिका तयार होऊ शकणार आहे.

आधुनिकतेची जोड

मोठय़ा विकास प्रकल्पांच्या सोबतीला नवी मुंबई महापालिकेचा कारभार अधिकाधिक लोखाभिमुख होईल यादृष्टीने गेल्या काही महिन्यांत सातत्यपूर्ण काम केले जात आहे. महापालिकेने सुरू केलेल्या तक्रार निवारण तसेच सुविधा अ‍ॅपमुळे नागरिकांना महापालिका कार्यालयांमध्ये येऊच लागू नये अशी व्यवस्था उभी करण्यावर विशेष भर दिला जात आहे. नवी मुंबई महापालिकेची स्वतंत्र परिवहन व्यवस्था असून सद्य:स्थितीत दिवसाला ४५० बसेस विविध मार्गावर आणण्यात आम्हाला यश आले आहे.

लोकाभिमुख प्रशासन हेच सूत्र

लोकाभिमुख प्रशासन हे महापलिकेच्या कामाकाजाचे प्रमुख सूत्र राहिले आहे. त्यामुळे कोणतीही सुविधा, तक्रारी यासाठी नागरिकांना महापालिका कार्यालयांमध्ये यावे लागू नये अशी व्यवस्था उभी करणे हा आमचा प्रयत्न आहे. महापालिकेने तयार केलेल्या अ‍ॅपमधून नागरिकांना थेट तक्रारी करण्याची सुविधा असून त्या सोडविल्या जात नाहीत तोपर्यंत त्याचे उत्तरदायित्व संबंधित अधिकाऱ्यावर कायम राहील, अशी व्यवस्था उभी करण्यात आली आहे. पाणीपुरवठा, सार्वजनिक विद्युत व्यवस्थेच्या देखभालीची कामेही  मानवविरहित होतील, अशी व्यवस्था उभी करण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. स्मार्ट शहर घडविताना तेवढेच स्मार्ट प्रशासन उभे करण्यासाठी विविध योजना, प्रकल्पांची आखणी केली जात आहे.

[jwplayer Za2fQPsP-1o30kmL6]