अविश्वास ठरावानंतर तुकाराम मुंढे यांची भूमिका; प्रकरण राज्य सरकारकडे

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात पालिकेने अविश्वास ठराव मंजूर केल्यानंतर हे प्रकरण आता राज्य सरकारकडे गेले आहे. मात्र, अविश्वास ठरावादरम्यान आपल्याला बोलू देण्यात आले नसल्याचा आरोप करीत मुंढे यांनी सरकारच्या निर्णयापर्यंत आपण काम करीत राहणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. या प्रकरणी सर्वपक्षीय नेते बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ठराव कायम ठेवण्याची मागणी करणार आहेत. यामुळे मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

नवी मुंबई पालिकेच्या विविध विभागांत झालेले घोटाळे व काही नगरसेवकांचे पद रद्द होण्याच्या भीतीने शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांच्या वतीने सभागृह नेते जयवंत सुतार यांनी आयुक्त मुंढे यांच्याविरोधात मंगळवारी दुपारी अविश्वासाचा ठराव मांडला. शिवसेनेचे स्थायी समिती सभापती शिवराम पाटील यांनी त्यास अनुमोदन दिले. त्यानंतर महापौर सुधाकर सोनावणे यांनी हा ठराव मतांसाठी सभागृहापुढे ठेवला. १११ नगरसेवकांपैकी १०४ नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. भाजपच्या सहा नगरसेवकांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. राष्ट्रवादीचे एक नगरसेवक नवीन गवते पोलीस नोंदीनुसार फरारी आहेत. त्यामुळे १०४ विरुद्ध ६ मतांनी हा ठराव मंजूर झाला.

बाजू मांडण्याची संधी

हा ठराव तात्काळ नगरविकास विभागाकडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर शासन या ठरावावर सुनावणी घेण्याची शक्यता आहे. या सुनावणीत मुंढे यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार असून नगरविकास विभागाकडून तयार करण्यात आलेला हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठरावावर अंतिम निर्णय घेणार असून त्याला कालमर्यादा नाही. तोपर्यंत मुंढे पालिकेचा कारभार सांभाळणार असून हा कालावधी एक वर्षांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.