01 March 2021

News Flash

कुटुंबसंकुल : तुळशींचे संकुल

तुळशीची भरपूर रोपे आणि सर्वत्र हिरवळ ही तुळशी निवास सोसायटीचे प्रमुख वैशिष्टय़.

तुळशीची भरपूर रोपे आणि सर्वत्र हिरवळ ही तुळशी निवास सोसायटीचे प्रमुख वैशिष्टय़.

तुळशी निवास सोसायटी, सेक्टर-५, सीबीडी बेलापूर

तुळशीची भरपूर रोपे आणि सर्वत्र हिरवळ ही तुळशी निवास सोसायटीचे प्रमुख वैशिष्टय़. सुरक्षितेच्या दृष्टीने आवारात सीसीटीव्ही बसविण्यात आल्या आहेत. याशिवाय संरक्षक भिंतही बांधण्यात आली आहे.

इमारतींच्या संरक्षक भिंतीभोवती चारही बाजूने गर्द हिरवी झाडी. आवार म्हणजे छोटी छोटी उद्यानेच. सर्वत्र विविध पक्ष्यांच्या किलबिलाटाने रहिवाशांची नेहमीच पहाट होते. सीबीडी बेलापूर सेक्टर-५ मधील मधील तुळशी निवास सोसायटी. तुळसी निवासचे वैशिष्ट यातच सामावलेले आहे. यासाठीच हे गृहसंकुल ओळखले जाते. म्हणजे तुळशी निवासाच्या आवारात मोठय़ा प्रमाणावर तुळशीची रोपे आहेत.

१९८२ साली सिडकोने हे गृहसंकुल वसवले. सी-५ ते १२ आणि सी-५ ते १६ अशा पाच  इमारती. प्रत्येक इमारतीत २०० घरे.  निसर्गाने भरभरून दिलेले गृहसंकुल.

‘तुळशी निवासा’च्या आवारात हिरवळ चोहीकडे आहे. तिच्यासोबत साळुंक्या, कोकिळा यासारखे पक्षी आणि खारूताईचा मुक्त वावर हे येथील आणखी एक वैशिष्टय़. जांभळाची झाडांचीही संख्या येथे मोठी आहे. प्रमाणात असल्याने परिसरातील नागरिक जांभळांचा आस्वाद घेण्यासाठी सोसायटीत येतात.

वाहनांच्या सोयीसाठी स्वतंत्र पार्किंगची सुविधा  आहे.  हिरवळीची देणगी रहिवाशी जपत असल्याने मुंबईच्या तुलनेत कमी उकाडा येथे जाणवतो.

राष्ट्रीय सणाला ध्वजवंदन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केले जाते. याशिवाय लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धा, वेशभूषा आणि इतर क्रीडास्पर्धाचे आयोजन केले जाते. मध्यवर्ती भागातील रंगमंचावर कार्यक्रम पार पडतात आणि मुले स्पर्धेच्या आधी येथे तालमी रंगवतात. मुलांच्या स्पर्धेत क्रमांक न काढता सर्व सहभागींना पारितोषिके देण्यात येतात.

याशिवाय महिलांसाठी पाककला कौशल्य, फॅशन शो सारख्या स्पर्धा तर पुरुषांसाठी क्रीडा स्पर्धा,संगीत खुर्ची यांसारखे कार्यक्रम ठेवले जातात. यादिवशी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात येतो. यासाठी संकुलातील महिला विशेष पाककला सादर करतात.

यासाठी आर्थिक व्यवहारांचे वार्षिक लेखापरीक्षण  सीएच्या वतीने केले जाते. संकुलाच्या सर्व हिशेबांची तपासणी करून लेखा अहवाल तयार केला जातो आणि तो प्रत्येक  रहिवाशांच्या घरी पाठवला जातो. याशिवाय १५ ऑगस्टला सर्वसाधारण सभा होते. त्यात सगळे निर्णय सर्वानुमते घेतले जातात. सभेला रहिवाशांच्या उपस्थितीसाठी आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे सभांना गर्दी असते. पाणी बचत आणि प्लास्टिकमुक्तीसाठी खास प्रयत्न केले जातात.

वीज बचतीसाठी एलईडी दिवे आवारात लावण्यात आले आहेत. प्रत्येक इमारतींचेअग्नि सुरक्षा विमा काढण्यात आला आहे. याव्यतिरिक्त पाच लाखांचा वेगळा विमाही काढण्यात आला आहे. इमारतींची रंगरंगोटी आणि डागडुजीचा खर्च रहिवाशी स्वखर्चाने करतात.

होळी, लोहरी यांसारखे सण पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात. ३५ वर्षांपूर्वीचे सिडकोचे बांधकाम असल्याने पुनर्विकासाचा सध्या विचार सुरू आहे. याशिवाय रोकडविरहित व्यवहारांसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सचिव डॉ. मनीष भट यांनी सांगितले.

तुळसी विवाहाची परंपरा

दरवर्षी नवीन लग्न झालेल्या जोडप्यामार्फत तुळशीची पूजा केली जाते. तुळशी विवाहाच्यावेळी सार्वजनिक दिमाखदार विवाहसोहळा पार पाडला जातो. त्यात मराठी लोकवस्ती कमी असली तरी सगळे रहिवाशी उत्साहाने सहभागी होतात.

ओला-सुका कचरा वर्गीकरण

ओला आणि सुका कचरा व्यक्तिगत पातळीवर वेगळा करण्यात येतो.त्यासाठी कडक सूचना देण्यात आल्या आहेत. खासगी बँकेने मुंबई शहरात राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानात या सोसायटीला स्वच्छ सोसायटी म्हणून पारितोषिक मिळाले आहे.

महिलांसाठी एक सुट्टी हक्काची

या सोसायटीतील महिला अ‍ॅक्टिव असल्याने वर्षांतुन एकदा त्या वेगवेगळ्या ठिकाणी महिलांसाठी सार्वजनिक सहलींचे आयोजन करतात.सहलींचे सर्व नियोजन महिलाच सांभाळतात.पुणे,कोल्हापुर यांसारख्या विविध ठिकाणी निसर्गरम्य परिसरांचा शोभ घेऊन सहलींची ठिकाणी ठरविण्यात येतात. या दिवशी मुलांची जबाबदारी घरातील पुरुष मंडळी सांभाळतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 2:14 am

Web Title: tulsi nivas housing society sector 5 cbd belapur navi mumbai
Next Stories
1 ‘गणेश नाईक भाजपमध्ये आल्यास स्वागत करू’
2 पत्रकार हल्ल्याप्रकरणी आमदाराच्या भावास अटक
3 अडीच हजार नियमबाह्य़ गतिरोधक भुईसपाट
Just Now!
X