वाशीच्या तुंगा रिजन्सी हॉटेल व्यवस्थापनाला सिडको प्रशासनाचा धक्का
वाशी रेल्वे स्थानकाबाहेर सार्वजनिक वाहनतळासाठी राखीव असलेला भूखंड केवळ आपल्या ग्राहकांच्या वाहनतळासाठी वापरणाऱ्या सेक्टर ३०अ मधील तुंगा हॉटेल व्यवस्थापनाला सिडको प्रशासनाने आज दणका दिला. हॉटेल व्यवस्थापनाचा भूखंड हस्तांतरणाला विरोध करणारा अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर सिडकोने सुमारे आठ हजार चौरस मीटरच्या या भूखंडाचा सोमवारी ताबा घेतला. आता तो जनतेसाठी खुला झाला आहे.
सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी हॉटेलच्या या मनमानीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. नवी मुंबईत सिडकोने सवलतीच्या दरात दिलेल्या भूखंडांचा मोठय़ा प्रमाणात गैरवापर सुरू आहे. वाशी रेल्वे स्थानकाबाहेर अरुणाचल प्रदेश सरकारला अतिथिगृहासाठी, तसेच नवी मुंबई महापालिकेला सार्वजनिक रुग्णालयासाठी वाशी सेक्टर दहा येथे देण्यात आलेल्या भूखंडांचा गैरवापर झाल्याचे आढळून आल्यानंतर सिडकोने हे भूखंड काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचप्रमाणे, वाशी रेल्वे स्थानकाबाहेर सेक्टर ३० अमध्ये भूखंड क्रमांक ३६ अ हा सार्वजनिक वाहनतळासाठी राखीव ठेवलेला भूखंड तुंगा रिजन्सी या पंचतारांकित हॉटेलने सिडकोबरोबर करार करून स्वत:च्या वापरासाठी घेतला होता. त्यामुळे या जागेवर या हॉटेल व्यवस्थापनाची मनमानी सुरू झाली होती.
याविरोधात ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यामुळे डिसेंबर २०१५ मध्ये न्यायालयाने या हॉटेलच्या विरोधात कारवाई करण्याचे सिडकोला आदेश दिले होते. त्यास हॉटेल व्यवस्थापनाने सत्र न्यायालयात एक अर्जाद्वारे आव्हान दिले. शनिवारी सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावत सिडकोला भूखंडाचा ताबा घेण्याचे आदेश दिले. अशा प्रकारे नवी मुंबईत अनेक भूखंडांचा गैरवापर सुरू असून त्यांच्यावर तक्रारीअभावी कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.